लोणी काळभोर : अपघातातील वाहन परिवहन विभागाकडून तपासणी करून तक्रारदारास परत देण्यासाठी १० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या पोलीस कर्मचाºयाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने जेरबंद केले आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणेचे पोलीस उप आयुक्त/ पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी पोलीस नाईक लोकेश रमेश राऊत (वय ३६, रा. कैलास गरूड यांची बिल्डिंग दुसरा मजला कदमवाकवस्ती लोणी काळभोर जि. पुणे) यास अटक केली आहे. राऊत हा लोणी काळभोर पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. हद्दीत एका वाहनाचा अपघात झाला होता. या अपघातातील वाहनावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या वाहनाची परिवहन विभागाकडून तपासणी करून तक्रारदारास वाहन परत देण्यासाठी राऊतने ४० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. परंतु तडजोडीअंती ही रक्कम १० हजार रुपयांवर आली.
तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला व त्यांना सर्व प्रकार सांगितला. ठरलेल्या नियोजनाप्रमाणे पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक अर्चना दौंडकर, सुरेखा घार्गे व त्यांच्या पथकाने लोणी काळभोर पोलीस ठाणे परिसरात सापळा रचला.
सायंकाळी तक्रारदाराने दिलेली १० हजार रुपयांची लाच पोलीस ठाण्याच्या आवारात स्वीकारताना लोकेश राऊतला रंगेहाथ पकडण्यात आले. त्याला अटक करण्यात आली असून, पुढील तपासासाठी लोणी काळभोर पोलिसांच्या ताब्यात दिले. पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक प्रतीभा शेडगे करत आहेत.