पुणे : तब्बल 22 वर्षे पाेलिसांना गुंगारा देणाऱ्या आराेपीला पुणे पाेलिसांच्या गुन्हे शाखेने सापळा रचून अटक केली आहे. 22 ऑगस्ट 1997 राेजी आराेपी व त्याच्या साथिदारांनी येरवडा भागातील साेन्याचे दुकान फाेडून 40 लाख रुपयांचा ऐवज चाेरला हाेता. त्यावरुन येरवडा पाेलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला हाेता. विलास उर्फ अविनाश विश्वनाथ भालेराव (वय 48, रा. सणसवाडी, शिरुर) असे त्या आराेपीचे नाव असून त्याचे इतर साथिदार संताेष लक्ष्मण ओव्हाळ, राजेंद्र मामाजी नाडर, रामभाऊ विश्वनाथ सुर्यवंशी व चाेरीचे साेने घेणारे दाेन साेनार यांना पाेलिसांनी यापुर्वीच अटक केली हाेती. त्यापैकी तीन आराेपी आणि एका साेनाराला न्यायालयाने 7 वर्षांची शिक्षा ठाेठावली हाेती.
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रतनचंद जैन यांच्या येरवडा येथील काश्मिरी काॅलनी येथे असलेल्या अंबिका ज्वेलर्सवर विलास व त्याच्या साथिदारांनी 22 ऑगस्ट 1997 राेजी दराेडा टाकला हाेता. जैन हे दुकानाच्या मागे राहतात. गुन्ह्यातील चार आराेपींनी रात्री 11.30 च्या सुमारास जैन यांना घराबाहेर बाेलावून तलवारीने त्यांच्यावर वार केले हाेते. तसेच रिव्हाॅलवर डाेक्याला लावून जिवे मारण्याची धमकी दिली. आराेपींनी जैन यांना रात्री दुकान उघडायला लावले. त्यानंतर दुकानातील राेख रक्कम आणि दिड किलाे साेन्याचे दागिने असा चाळीस लाख रुपयांचा ऐवज चाेरुन नेला हाेता.
येरवडा पाेलिसांनी या गुन्ह्याचा तपास करताना दराेडा टाकणाऱ्या आराेपींना अटक केली हाेती. परंतु विलास हा पाेलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी झाला हाेता. गुन्ह्यातील इतर आराेपींना न्यायालयाने शिक्षा सुनावली तरी विलास हा फरार हाेता. पुणे पाेलीस दलाच्या गुन्हे शाखेकडून शहरातील फरार व पाहिजे आराेपींंच्या शाेधाकरीता सहाय्यक पाेलीस आयुक्त यांच्या अधिपत्याखाली विशेष पथक स्थापन केले आहे. या पथकातील पाेलीस नाईक महेश निंबाळकर यांना फरार आराेपी विलास हा शिरुर येथे राहत असल्याची खात्रीशिर माहिती मिळाली हाेती. त्यानंतर महेश निंबाळकर यांच्या बराेबर संभाजी नाईक, राजकुमार पाटील यांनी साेमवारी सणसवाडी येथे सापळा रचून विलासला ताब्यात घेतले. त्याच्याकडे गुन्ह्याबाबत चाैकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. इतर आराेपींसाेबत विलास याची येरवडा कारागृहात ओळख झाली हाेती. त्यानंतर सगळे कारागृहाबाहेर आल्यानंतर त्यांनी शिक्रापूर येथील मुन्ना दा ढाबा येथे सदर गुन्ह्याचा कट रचला हाेता.
साेन्याच्या दुकानावर दराेडा टाकल्यानंतर त्याची वाटणी करुन विलास फरार झाला हाेता. ताे लातूर, घाटकाेपर, पारनेर, अहमदनगर या ठिकाणी जागा बदलून राहत हाेता. विलासवर यापूर्वी 40 घरफाेडीचे गुन्हे दाखल आहेत. आराेपीला येरवडा पाेलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई गुन्हे शाखेचे अप्पर पाेलीस आयुक्त अशाेक माेराळे, पाेलीस उप आयुक्त बच्चन सिंग, सहाय्यक पाेलीस आयुक्त डाॅ. शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पाेलीस पथकातील महेश निंबाळकर, संभाजी नाईक, राजकुमार पाटी यांच्या पथकाने केली.