पुणे : पालखी मार्गावर गर्दीचा फायदा घेऊन भाविकांच्या दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या सोनसाखळी चोरांना विश्रांतवाडी पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून सुमारे चाळीस हजार किमतीची दाखल गुुन्ह्यातील दिडतोळ्यांची सोनसाखळी हस्तगत करण्यात आली. याप्रकरणी दत्ता विजय गायकवाड (वय19) व विक्रांत चंद्रकांत गायकवाड (वय23, दोघेही रा.गांधीनगर,बीड) यांना अटक करण्यात आली आहे.
पोलिस निरीक्षक अरूण आव्हाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीनिमित्त आळंदी रस्त्यावर बंदोबस्त नेमण्यात आला होता. दरम्यान बनाना लिफ हाॅटेल कळस चौक येथे दोन संशयित इसम पालखीच्या गर्दीत दिसून आले. त्यांना हटकले असता ते पळून जाऊ लागले. त्यांचा पाठलाग करून ताब्यात घेतले असता त्यामधील एकाच्या खिशात एक सोनसाखळी मिळाली. अधिक तपासात पालखी मार्गावर गर्दीचा फायदा घेऊन त्यांनी चोरी केल्याचे कबूल केले. पोलिस निरीक्षक अरूण आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रमुख उपनिरीक्षक अभिजीत चौगुले,पोलिस कर्मचारी विजय सावंत,यशवंत किर्वे, प्रविण भालचिम ,किशोर दुशिंग, प्रफुल्ल मोरे, रिहान पठाण, सोमनाथ खळसोडे, शेखर खराडे, संदिप देवकाते, अनिकेत भिंगारे, महिला पोलिस नाईक सुरेखा हिले यांच्या पथकाने हि कारवाई केली.