पुणे: कुख्यात गुंड गजानन मारणे (gajanan marne) विरोधात पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. मिरवणूक प्रकरण आणि त्यापाठोपाठ गजा मारणे फरार झाल्यानंतर पोलिसांनी आता त्याच्या साथीदारांच्या मुसक्या आवळायला सुरुवात केली आहे. गुंड गजानन मारणेच्या साथीदारांना कोथरूड पोलिसांनी अटक केली आहे. मिरवणूक काढल्या प्रकरणी या सगळ्यांना अटक करण्यात आली आहे. याच बरोबर या प्रकरणात सात गाड्याही पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
मारणे तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर मिरवणूक काढत पुण्याला आला होता. यानंतर कोथरुड पोलिसांनी त्याच्यासह त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात मारणे आणि त्याच्या चार साथीदारांना पोलिसांनी १८ फेब्रुवारीला अटक केली होती. त्यापाठोपाठ पोलिसांनी आणखी आठ जणांना बेड्या ठोकल्या. २० तारखेला आणखी दोन जणांना पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर आता आणखी सहा जणांना पोलिसांनी या गुन्ह्यात अटक केली आहे. समीर पाटील, अतुल ससार, राहुल उभे, सागर हुलावळे, रामदास मालपोटे आणि कैलास पडवळ अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
या प्रकरणात वापरण्यात आलेल्या सात गाड्या ज्या मारणे येणे तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर मुंबईहून पुण्याकडे येताना वापरल्या होत्या त्याही पोलिसांनी जप्त केलेल्या आहेत. यात एक मर्सिडीज, जग्वार, पजेरो स्पोर्ट कार तसेच महिंद्रा स्कॉर्पिओचा समावेश आहे.