केडगाव: चौफुला-मोरगाव रस्त्यावरील सुपा घाट येथे ट्रकला कार आडवी मारुन ट्रकमधील दोघे चालक यांना ट्रकसह पळवून नेत अज्ञात ठिकाणी डांबून ट्रकमधील गव्हाच्या ३१५ गोण्या चोरणा-या टोळीला गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी जेरबंद केले. या टोळीमध्ये ८ दरोडेखोरांचा समावेश असून तिन दिवसांत हा गुन्हा पोलीसांनी उघडकीस आणला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी (दि.२५) सकाळी ११ ला रामप्रसाद राठोड (रा.राजस्थान) हे त्यांच्या ट्रकमधून गव्हाच्या गोण्या गोव्याला घेवून जात होते. यावेळी केडगाव चौफुला-मोरगाव रस्त्यावर सुपा घाटाच्या पहिल्या वळणावर चोरट्यांनी त्यांच्या ट्रक पुढे मोटार कार आडवी लावली. आरोपींनी गाडीतून उतरुन ट्रक चालकास दमदाटी करुन ट्रकमधील दोघांना खाली उतरवत त्यांच्याकडील मोबाईल जबरदस्तीने काढून घेतला. तसेच त्यांना कारमध्ये नेत अज्ञात ठिकाणी डांबवून ठेवले. ट्रक व त्यामधील ३१५ गव्हाची गोणी असा एकूण १६ लाख ९३ हजार रूपयांचा माल चोरुन नेला. ट्रकमधील दोघांना तिस-या दिवशी बारामती येथे निर्जन ठिकाणी सोडून दिले होते. त्याबाबत रामप्रसाद राठोड यांनी गुरूवारी (दि.२८) यवत पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दिली. या गुन्ह्याचा छडा लावणे हे पोलीसांसमोर एक मोठे आव्हान होते.
पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी हा गुन्हा उघडकीस आणणेसाठी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपास करणेबाबत आदेश दिले होते. गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने यवत पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखेची वेगवेगळी पथके तयार करण्यात आलेली होती. स्थानिक गुन्हे शाखेकडून वरीष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली नेमलेल्या पथकाकडून पुणे, सातारा व सोलापूर जिल्ह्यात तपास चालू होता. खब-यामार्फत चोरटे हे मांडवे (ता.माळशिरस जि.सोलापूर) येथील सागर अंबादास चव्हाण व त्याच्या साथीदारांनी ट्रक लुटल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनी सापळा रचून सागर अंबादास चव्हाण (वय २५, रा.मांडवे ता.माळशिरस जि.सोलापूर), मंगेश उर्फ पप्पू राजेंद्र चव्हाण (वय २६, रा. क-हावाघज ता. बारामती जि.पुण), सुरज लक्ष्मण गाडे (वय २१, रा.सावंतवाडी ता.बारामती जि.पुणे), रेवणनाथ प्रभाकर जाधव (वय २६, रा.विट ता.करमाळा जि.सोलापूर), उमेश मधुकर काळे (वय वय २७, रा.वाशिम ता.कर्जत जि. अहमदनगर), शेखर सुभाष शिंदे (वय २४, रा.सांगवी ता.बारामती जि.पुणे), सचिन महादेव गेजगे (वय ३१, रा.मांडवे, ता.माळशिरस जि.सोलापूर), महेश मारुती पेड़कर (वय ३६, रा.फोंडशिरस ता.माळशिरस जि.सोलापूर) या आठ जणांना अकट केली. त्यांची चौकशी केली असता त्यांनी संगनमताने मिळून ट्रकवर दरोडा टाकून चोरलेल्या गव्हाच्या गोण्या महेश पेड़कर याच्या मध्यस्थीने नातेपुते येथे विकून मोकळा ट्रक हा करमाळा येथे निर्जन ठिकाणी सोडून दिल्याचे सांगितले. आरोपींकडून गन्ह्यात वापरलेली कार, जीप तसेच चोरलेला ट्रक व माल हस्तगत करण्यात आलेला आहे.
ही कारवाई गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक जीवन माने, सहा.उपनिरीक्षक दत्तात्रय गिरमकर, दयानंद लिम्हण, अनिल काळे , रवि कोकरे , महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, प्रविण मोरे, राजू मोमीन, बाळासाहेब खडके यांनी केली.