पुणे : पुण्यात सोनसाखळी आणि बॅग लिफ्टिंग करुन पोलिसांना घाम फोडणारा राजू राठोड ऊर्फ राजाभाऊ राठोडला पोलिसांनी अटक केली आहे. मूळचा बिगारी कामगार असलेल्या राजूने नंतर लातूर आणि पुणे परिसरात इलेक्ट्रिशन, वायरमन म्हणून काम केले. त्यानंतर त्याने एमएसईबीकडून लाईट मीटर व वायरिंगचे कामही केले. लातूर येथे रियल इस्टेट एजंट म्हणून प्लॉटिंगचा व्यवसायही केला. पण ऐशोआरामाचे जीवन जगण्यासाठी त्यातून त्याला तितका फायदा मिळत नव्हता. त्यामुळे त्याने सोनसाखळी चोरीचा मार्ग निवडला.लातूरमध्ये त्याने सोनसाखळी व बॅग चोरीचे बरेच गुन्हे केले. त्यातील पैशातून त्याने लातूरमध्ये मोठा बंगला खरेदी केला व समाजात प्रतिष्ठित म्हणून वावरु लागला. चोरीच्या पैशातून त्याने राजकीय लोकांशी सलगी वाढवून लातूर जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडणूक लढविण्याचा देखील प्रयत्न केला. त्यासाठी अर्जही दाखल केला होता. पण त्याला माघार घ्यायला सांगण्यात आले. त्याच दरम्यान पोलिसांनी सोनसाखळी चोरी करताना त्याला रंगे हाथ पकडले व त्याचा खरा चेहरा समोर आला. त्यांच्याकडून अनेक गुन्ह्यातील चोरीस गेलेले सोने व पैसे जप्त करण्यात आले. राजूला काही वर्षांपूर्वी लातूरमधील तुरुंगात ठेवण्यात आले. तेथे त्याची शिवा बिरादार याच्याशी ओळख झाली. लातूरमध्ये आता आपण बदनाम झालो हे लक्षात आल्यावर राठोड तुरुंगातून सुटल्यावर शिवाला घेऊन मे महिन्यात पुण्यात आला. सुरुवातीला पुणे शहरातून एक मोटारसायकल चोरुन त्यावरुन चालत्या रिक्षातून बॅग चोरी व सोनसाखळी चोरीचे गुन्हे करु लागला. चोरीची मोटारसायकल घेऊन तो चोरी करीत असे. कालांतराने तो मोटारसायकल सोडून देत असे. सोनसाखळी व बॅग चोरीतून मिळालेल्या पैशातून त्याने वडगाव भागात जुना मुंढवा रोडवर हॉटेल नंदिनी नावाने हॉटेल व्यवसाय सुरु केला. हॉटेल व्यवसाय चांगला चालू लागल्यावर चोरीचे प्रकार सोडून देण्याचा त्याचा विचार होता. पण, त्याअगोदरच पोलिसांनी त्याचा खरा चेहरा समोर आणला. युट्युबवरुन सुचली हॉटेलची कल्पनाराठोडला युट्युबवरुन हॉटेल सुरु करण्याची कल्पना सुचली. त्याने दोघांसाठी १२०० रुपयांची थाळी अशी योजना सुरु केली होती. जर दोघांनी ही थाळी संपविली तर ५००० रुपये कॅश बॅक देण्याची योजना सुरु केली होती. त्याचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता. या हॉटेलसाठी त्याने जाहिरात देऊन आलेल्या लोकांच्या मुलाखतीही घेतल्या होत्या. मुख्य आचाऱ्याला २५ हजार रुपये व वेटरला ९ हजार रुपये पगार देऊन त्यांच्या राहण्याचीही व्यवस्था त्याच ठिकाणी केली होती.
बिगारी कामगार ते हॉटेल व्यावसायिक; चोरट्याचा खरा चेहरा अखेर जगासमोर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2018 11:57 PM