पुणे : मुंबई-विजापुर पॅसेंजरमध्ये महिलांच्या डब्यात दरोडा टाकण्याच्या तयारीत असणा-या १४ जणांच्या टोळीतील सात जणांना जेरबंद करण्यात आले आहे. या टोळीमध्ये दोन अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे.
आरोपींकडून गुह्यासाठी वापरण्यात येणारे दोन चाकु, ब्लेड व मिरची पुड हस्तगत करण्यात आली आहे. ही कारवाई लोहमार्ग पोलिसांच्या गुन्हे शाखेने सोमवारी केली. शंकर भिमराव जगले (२०), यशवंत बाळू वाघमारे (२०), अशोक संतोष अडवाणी (वय २१, तिघेही रा. पिंपरी), समाधान कांताराम वणवे (वय २१, रा. अहमदनगर), श्रीनिवास व्यंकटस्वामी सिडगल (वय ३६, रा.देहुरोड) अशी अटक आरोपींची नावे आहेत. तर त्यांच्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले आहे. या संदर्भात माहिती देताना लोहमार्ग गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेशसिंग गौड यांनी सांगितले, विजापुर पॅसेंजर गाडीवर तळेगाव रेल्वे स्टेशन येथे १२ ते १४ जणांची टोळी दरोडा टाकणार असल्याची खबर सोमवारी मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेतील सहायक पोलीस निरीक्षक मंगेश जगताप व त्यांच्या कर्मचा-यांना बोलावून घेऊन तीन पथके तयार करण्यात आली. यानंतर तळेगाव रेल्वे स्टेशन येथे सापळा रचण्यात आला. रात्र तीनच्या सुमारास विजापुर पॅसेंजर तळेगाव रेल्वे स्टेशन येथे थांबताच १४ जणांची टोळी महिलांच्या डब्यात दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात होती. या टोळीवर अचानक धाड टाकून त्यातील सात जणांना पकडण्यात यश आले. उर्वरीत सात जण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. ताब्यात घेतलेल्या व्यक्तींची अंगझडती घेतली असता, त्यांच्याकडे चाकु, ब्लेड आणी मिरची पुड सापडली. या सर्वांना अटक करून न्यायालयात हजर केले असता १८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
पोलीस अधिक्षक तुषार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेशसिंग गौंड, सहायक पोलीस निरीक्षक मंगेश जगताप, सहायक पोलीस फौजदार भोसले, महिला सहायक फौजदार बनसोडे, पोलीस हवालदार धनंजय दुगाने, अनिल दांगट, जगदिश सावंत, पोलीस नाईक सुनिल कदम, पोलिस शिपाई दिनेश बोरनारे, विक्रम मधे, स्वप्निल कुंजीर, अतुल कांबळे, निळकंठ नांगरे, काशिनाथ पुजारी, दिगंबर मोरे यांच्या पथकाने केली.