नीरा येथे १ एप्रिल रोजी झालेल्या अपघाताचे गूढ दिवसेंदिवस वाढत चालले आहे. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून एक महिला अजूनही मृत्यूशी झुंज देत आहे. मात्र, पोलिसांना अजूनही खरा आरोपी सापडला नाही. त्यामुळे खुनाच्या गुन्ह्याचा छडा अवघ्या १२ ते २४ तासांत लावणाऱ्या पोलिसांच्या या प्रकरणातील भूमिकेबद्दल लोकांमधून शंका उपस्थित करण्यात येत आहेत.
१ एप्रिल रोजी निरेतील नगर बायपास रोडवर मॉर्निग वॉकसाठी निघालेल्या दोन महिलांना एका स्विफ्ट कारणे जोरदार धडक देऊन गंभीर जखमी केले होते. यानंतर या स्विफ्ट कारचा चालक कार तेथेच सोडून फरार झाला होता. अपघातानंतर चार दिवसांतही पोलिसांना कारचा मालक किंवा चालक सापडला नव्हता. यानंतर या अपघातातील एक जखमी महिला यामध्ये मृत्युमुखी पडली. तरी देखील पोलिसांकडून या घटनेची गांभीर्याने दखल घेतली गेली नव्हती. सामाजिक संघटनांनी याविरोधात आवाज उठवल्यानंतर आता पोलिसांनी दोन व्यक्तींना ताब्यात घेतले असून त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती मिळते आहे.
याबाबत जेजुरी पोलीस स्टेशन मध्ये चौकशी केली असता याप्रकरणी माहिती देण्यास पोलिसांकडून टाळाटाळ केली जाते आहे. यामध्ये पोलिसांनी निरेतील एका प्रतिष्ठीत व्यक्तीला ताब्यात घेतले. त्यामुळे उलट-सुलट चर्चेला उधाण आले. या गुन्ह्यात आणखी किती लोकांचा सहभाग आहे, याबाबतचा गूढ वाढल आहे. घटना घडल्यापासून हा अपघात नसून घातपात असावा असा संशय निरेतील अनेक लोकांकडून बोलून दाखवला जात होता. मात्र या घटनेतील महिला मृत्यूमुखी पडल्या नंतरही पोलिसांकडून कोणत्याही हालचाली होत नव्हत्या. अखेर आर.पी.आय.च्यावतीने जिल्हा युवक अध्यक्ष अमोल साबळे यांनी या घटनेचा तपास तातडीने लावण्याची मागणी केली आणि त्यानंतर पोलिसांनी दोन व्यक्तींना ताब्यात घेतले आहे. तर एक जण फरार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे .