पुणे : प्रेमविवाह करणाऱ्या तरुणाची नातेवाईकांनी हत्या केल्याचा ऑनर किलिंगचा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. लोहगाव येथे गेल्या वर्षी १९ व २० जुलै २०१७ मध्ये ही घटना घडली होती. वर्षभरानंतर पोलिसांनी दोघांविरूद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. इंद्रजीत उमाशंकर गौड असं नातेवाईकांचा विरोध पत्करुन प्रेम विवाह करणाऱ्या तरुणाचं नाव आहे.
विमानतळ पोलिसांनी याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कमलेश मल्लू गौड आणि अमरनाथ दशरथ गौड (रा. उत्तरप्रदेश) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. हा प्रकार उघडकीस आल्यावर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. शवविच्छेदनात इंद्रजीत याच्या अंगावर मारहाणीच्या खुणा असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर आता वर्षभरानंतर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इंद्रजित उमाशंकर गौड याने नातेवाईकांचा विरोध पत्करुन प्रेम विवाह केला होता. त्यामुळे त्याच्या सर्व नातेवाईकांनी त्याच्याशी संबंध तोडले होते. त्याचा मामा आणि चुलत भाऊ जास्त नाराज होते. इंद्रजीतला धडा शिकविण्याचा त्यांनी विचार केला. १९ जुलैच्या रात्री ते दोघे त्याच्या घरी गेले आणि त्यांनी इंद्रजीतला जबर मारहाण करत गळा दाबून त्याची हत्या केली.
दुसऱ्या दिवशी सकाळी हा प्रकार उघडकीस आला तेव्हा पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. डॉक्टरांकडून शवविच्छेदनाचा अहवाल मिळाला मात्र इतके दिवस त्याकडे दुर्लक्ष केले गेले. या शवविच्छेदन अहवालात अंगावर मारहाणीच्या खुणा असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार त्याचा तपास केल्यानंतर आता शवविच्छेदन अहवालावरुन हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.