पुणे - पुण्यातील प्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये एमआरआय काढण्यासाठी आलेल्या महिलेचा कपडे बदलतानाचा व्हिडिओ काढण्यात आल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी वॉर्डबॉयला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेच्या पोटात दुखत असल्याची तक्रार होती. हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी त्यांना एमआरआय काढण्यास सांगितले. त्यानुसार ही महिला शनिवारी सायंकाळी एमआरआय काढण्यासाठी जहांगीर हॉस्पिटलमध्ये आली होती. या महिलेला चेंजिंग रुममध्ये कपडे बदलण्यास नेण्याऐवजी दुसऱ्या खोलीत कपडे बदल्यास सांगितले. त्यानंतर ही महिला एमआयआय करुन आली. तेव्हा परत दुसऱ्या खोलीत कपडे बदल्यास सांगण्यात आले.
महिला जेव्हा कपडे बदलू लागली, तेव्हा तेथे तिला एक मोबाईल दिसला. तिने हा मोबाईल घेऊन त्यात पाहिले असता ती कपडे बदलत असतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड केला गेला होता. ही गोष्ट या महिलेने आपल्या पतीला सांगितली. तिच्या पतीने याबाबत हॉस्पिटल प्रशासनाकडे चौकशी केल्यावर त्यांनी वॉर्डबॉयला बोलवून जाब विचारला. पण पुढे काहीही कारवाई केली नाही. तेव्हा त्यांनी 100 क्रमांकावर फोन करुन पोलिसांना कळविले. ही माहिती मिळताच कोरेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस हॉस्पिटलमध्ये पोहचले व त्यांनी वॉर्डबॉयला ताब्यात घेतले. कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री उशिरा गुन्हा नोंदविण्यात येऊन वॉर्डबॉयला अटक करण्यात आली आहे.