पुणे : लाॅकडाऊन घाेषित झाल्यानंतर विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांना पाेलिसांनी चाेप दिला हाेता. त्यावर टीका झाल्यानंतर ही कारवाई साैम्य करण्यात आली हाेती. आज सकाळी महापालिकेत निघालेल्या कर्मचाऱ्याला पाेलिसांनी लाठीने मारहाण केल्याचा प्रकार समाेर आला आहे. विशेष म्हणजे कर्मचाऱ्याच्या गळ्यात पालिकेचे ओळखपत्र असतानाही ही मारहाण करण्यात आल्याचा आराेप कर्मचाऱ्याकडून करण्यात आला आहे.
लाॅकडाऊननंतर सर्वच व्यवहार तसेच ऑफिसेस बंद करण्यात आली आहेत. केवळ अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना ओळखपत्र दाखवून साेडण्यात येत आहे. सरकारी कार्यालयांमध्ये पाच टक्के कर्मचाऱ्यांवर काम करण्यात येत आहे. आज सकाळी पुणे महानगरपालिकेच्या सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ लिपीक रमेश ठाकूर हे कामावर येत असताना ज्ञानेश्वर पादुका चाैकामध्ये कामावर असणाऱ्या पाेलिसांनी त्यांना मारहाण केली. ठाकूर यांच्या गळ्यात महापालिकेचे ओळखपत्र असतानाही पाेलिसांनी त्यांना मारहाण केली. ठाकूर आपले ओळखपत्र दाखवत असताना देखील काहीही न ऐकून घेता पाेलिसांनी मारण्यास सुरुवात केली. या मारहाणीत ठाकूर यांना जबर मार बसला आहे.
दरम्यान या प्रकाराची महापालिकेने गंभीर दखल घेतली असून याबाबत पालिकेकडून मुख्यमंत्री कार्यालय तसेच पुणे पाेलीस आयुक्तालयात तक्रार केली आहे.