पुणे : शहरात दुपारी चारनंतर मेडिकल वगळता सर्व हॉटेल, रेस्टॉरंटसह इतर दुकानांना बंदी असताना रात्री उशिरापर्यंत हॉटेल चालवून ग्राहकांना मद्य पुरविले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. स्वारगेट पोलिसांनी या हॉटेलचालकासह १६ तळीरामांना दणका दिला आहे.
स्वारगेट पोलीस ठाण्यातील बीट मार्शल गस्त घालत असताना मित्रमंडळ चौकाजवळील पाटील प्लाझा येथील सिटी प्लाझा बार ॲन्ड रेस्टारंट हा प्रकार सुरू असल्याचे लक्षात आले. बीट मार्शल यांनी ही माहिती तातडीने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिली. अधिकाऱ्यांनी हॉटेलमध्ये जाऊन पाहणी केली. तेव्हा रेस्टाॅरंटमध्ये सामाजिक अंतर न पाळता मोठ्या प्रमाणावर गर्दी आढळून आली. रात्री उशिरा ग्राहकांना मद्य पुरविण्यात येत होते. पोलिसांनी हॉटेलचालकासह १६ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर साथरोग अधिनियमानुसार कारवाई केली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब कोपनर, पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्वारगेट पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.