कोरेगाव भीमा : ऐन दिवाळसणाच्या तोंडावर शिक्रापूर पोलिसांनी चोरीला गेलेल्या २७ दुचाकी मूळ मालकांना परत मिळवून देण्याचा अभिनव उपक्रम राबवला आहे. त्यामुळे आपल्या वाहनांचा शोध घेऊन दमलेल्या दुचाकीमालकांना दिवाळीच्या तोंडावर खरा आनंद मिळाला आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दुचाकीमालकांना ही भेट दिल्याची प्रतिक्रिया तहसीलदार राजेंद्र पोळ यांनी दिली. शिक्रापूर पोलीस ठाण्यात अपघातातील व गुन्ह्यात मिळालेल्या सुमारे १७८ दुचाकी अनेक वर्षांपासून पडून आहेत. शिक्रापूर पोलिसांनी व गंगामाता वाहन शोध संस्था या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून ठाण्यातील ३५ दुचाकींचे चासी क्रमांक घेऊन ते आरटीओ कार्यालयात दुचाकीच्या मूळ मालकांचा पत्ता शोधला. त्या ३५ मालकांशी पत्रव्यवहार करून संपर्क साधण्यात आला. त्यातील २७ दुचाकी मूळ मालकांना आज दुचाकींची मूळ कागदपत्रे तपासून दिवाळी भेट म्हणून त्यांची वाहने ताब्यात देण्यात आली. या वेळी तहसीलदार राजेंद्र पोळ, शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश गलांडे, सहायक पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे, पोलीस उपनिरीक्षक गणेश वारुळे, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे नवनाथ कांबळे आदी उपस्थित होते. गंगामाता वाहन शोध संस्थेच्या माध्यमातून चासी नंबरवरून ३५ दुचाकीमालकांचा शोध घेता आला अजून ८५ वाहनांच्या मूळ मालकांचा शोध घेण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांनी सांगितले. संस्थेच्या माध्यमातून गेल्या वर्षापासून ३,५०० वाहने मूळ मालकांना मिळवून देण्यात यश आल्याचे संस्थेचे अध्यक्ष राम उदावंत यांनी सांगितले.
पोलिसांची दुचाकीमालकांना दिवाळी भेट
By admin | Published: October 28, 2016 4:29 AM