आता बोला! बारामतीतच उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली; पोलिसांचे भर चौकात ‘बर्थ डे सेलिब्रेशन’
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2021 03:09 PM2021-06-12T15:09:14+5:302021-06-12T15:09:35+5:30
बारामती एमआयडीसी चौकात हा केक कापतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
बारामती: बारामती शहरात कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी निर्बंध लादलेले आहेत. कोरोना निर्बंध सुरु असताना भर चौकात पोलीसांनी केक कापत वाढदिवस साजरा केल्याचा प्रकार उघड झाला आहे.केक कापतानाचे छायाचित्र व्हायरल झाल्याने बारामतीकरांकडुन संताप व्यक्त होत आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पोलिसांवर कारवाई होणार का असा सवाल व्यक्त होत आहे.
सध्या बारामती गेल्या काही दिवसांपासुन निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र, कोरोनाबाधितांची अपेक्षित संख्या कमी होण्यास तयार नाही.कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ,कोरोनाची साखळी ‘ब्रेक’ करण्यासाठी ५ एप्रिल पासुन बारामतीत सर्वच दुकाने बंद होती. कोरोनाबाधितांची संख्या कमी झाल्यानंतर ८ जुनपासून केवळ तीन तास दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. ही दुकाने सुरु ठेवताना सोशल डिस्टन्स राखणे,सॅनिटायझरचा वापर,मास्क वापरणे आदी शासकीय नियमांचे पालन करणे बंधनकारक ठेवले आहे.
शनिवारी (दि १२) सकाळी ११ च्या दरम्यान बारामती एमआयडीसी चौकात हा केक कापण्यात आल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या छायाचित्रावरुन स्पष्ट दिसत आहे.रस्त्यावर केक कापणाऱ्या अनेकांची वरात पोलिसांनी पोलीस ठाण्यात नेली आहे. संबंधितांवर गुन्हे देखील दाखल केले आहेत.
मात्र, याच पोलिसांनी काही युवकांसह दुचाकीवर ठेवलेला केक कापत वाढदिवस साजरा केला आहे. शिवाय वाढदिवस साजरा करताना काही पोलिसांनी मास्क देखील वापरले नसल्याचे धक्कादायक चित्र आहे.तसेच सोशल डिस्टन्सचाही फज्जा उडविल्याचे या छायाचित्रावरून दिसुन येते. पोलीस सध्या कडक तपासणी करत आहेत.यामध्ये सर्वसामान्यांच्या वाहन परवान्यापासुन कसुन तपासणी करीत आहेत.यामध्ये कोणाचीही गय केली जात नाही. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जात आहे.कोरोना रोखण्यासाठी ही कारवाई आवश्यकच आहे.या कारवाईला बारामतीकरांचा आक्षेप नाही.मात्र, सर्वसामान्यांना नियम लागु करणाऱ्या पोलिसांनी भर चौकात केक कापण्याचा नियमबाह्य प्रकार दुर्लक्ष करुन चालणार नाही.
....भर चौकात केक कापत उपमुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला हरताळ फासला
शनिवारी (दि १२) केक कापण्याचा प्रक़ार सुरु असताना उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीत होते. पवार बारामतीत असतानाच पोलीसांचे भर चौकात हे सेलीब्रेशन सुरु होते.शासन व प्रशासनाच्या प्रयत्नांसह नागरीकांच्या सहकार्याने कोरोनाबाधितांची संख्या घटली आहे.तरीहि पुन्हा संसर्ग वाढु नये,यासाठी प्रत्येकाने खबरदारी घ्यावी.नियमांचे पालन काटेकोरपणे करा, असे आवाहन उपमुख्यमंत्री पवार यांनी आज पार पडलेल्या कोविड १९ विषाणु प्रादुर्भाव परीस्थिती आणि उपाययोजना बैठकीत केले. त्यानंतर काही वेळातच पोलिसांनी भर चौकात केक कापत उपमुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला हरताळ फासला.
—————————————————