मोकाट फिरणाऱ्यांची वाहने
करणार जप्त, सकाळी दुधासाठी सकाळी ७ ते ९ सवलत
बारामती : बारामती शहरात आज बुधवार (दि. ५) मध्यरात्री १२ पासून सात दिवस कडक लॉकडाऊन करण्यात येणार आहे. पोलिसांनी त्यासाठी शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे. बंददरम्यान विनाकारण फिरणाऱ्यांची वाहने जप्त करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी सांगितले.
‘लोकमत’शी बोलताना पोलीस निरीक्षक शिंदे म्हणाले, सकाळी दुधासाठी सकाळी ७ ते ९ सवलत देण्यात आली आहे. त्यानंतर एकाही नागरिकाला विनाकारण रस्त्यावर फिरू दिले जाणार नाही. बारामती शहरातील सर्व रस्त्यांवर पोलीस, एसआरपी, गृहरक्षक दलाच्या जवानांसह बाहेरील पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. एकूण २०० कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. शिवाय प्रत्येक अंतर्गत रस्त्याची नाकाबंदी करण्यात आली आहे. वैद्यकीय कारणाशिवाय तसेच डिजिटल पासशिवाय एकाही नागरिकाला रस्त्यावर येऊ दिले जाणार नाही. पोलिसांनी सर्व रस्ते बंद केले आहेत.
रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची वाहने जप्त केली जाणार आहेत. वाहन तपासणीची यंत्रणा पोलिसांकडे देण्यात आली आहे. त्यामुळे त्या वाहनाच्या मालकीची देखील पोलीस माहिती घेतील. यामध्ये दोषी वाहनांवर जप्तीची कारवाई करण्यात येईल. लॉकडाऊनचा कालावधी पूर्ण होईपर्यंत संबंधित वाहने पोलिसांच्या ताब्यात राहतील, नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर येऊ नये, नागरिकांच्याच सुरक्षेसाठी पोलीस काळजी घेत आहेत, असे आवाहन शिंदे यांनी केले आहे. दरम्यान, आज सायंकाळी पोलिसांचा सर्व कर्मचाऱ्यांसह शहरातून लाँग मार्च काढण्यात आला होता. यामध्ये माजी सैनिकदेखील सहभागी झाले आहेत.
————————————