बारामती : बारामती शहर, माळेगाव, एमआयडीसी चौक परिसरात होणारे मुलींच्या छेडछाडीचे प्रकार रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने कडक उपाययोजना केल्या आहेत. ‘लोकमत’ने बुधवारी स्टिंग आॅपरेशनअंतर्गत असुरक्षित मुलींचे वास्तव उघडकीस आणले. त्याची पोलीस प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली आहे. पोलीस निरीक्षक चंद्रकांत कांबळे यांनी एमआयडीसी चौक, तर पोलीस उपनिरीक्षक सुनील गायकवाड यांनी स्वत: महाविद्यालयीन परिसर पिंजून काढला. ५ टवाळखोर रोडरोमिओंना माळेगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर खटले दाखल करण्यात आले आहेत. माळेगाव येथे एका रोडरोमिओला पोलिसांनी चांगलाच चोप दिला. माळेगाव (ता. बारामती) येथे बुधवारी पोलीस प्रशासनाने पूर्ण परिसर पिंजून काढला. महाविद्यालय परिसरात टवाळखोरी करणाऱ्या ५ रोडरोमिओंना ताब्यात घेतल्याचे पोलीस उपनिरीक्षक सुनील गायकवाड यांनी सांगितले. तसेच, या ५ जणांवर खटले दाखल करण्यात आले आहेत. पोलीस अधिकाऱ्यांमार्फत समुपदेशन करून या पाच जणांना लेखी समज दिली जाणार आहे. तसेच, भविष्यात अशा प्रकारची टवाळखोरी करणार नसल्याबाबत त्यांच्याकडून हमी घेतली जाणार आहे. याशिवाय प्रत्येक शाळा, महाविद्यालयाच्या प्रमुखांशी पोलीस प्रशासनाने संपर्क साधला आहे. महाविद्यालय आवारात विद्यार्थिनींना छेडछाडीचे प्रकार घडल्यास तातडीने पोलिसांना संपर्क साधण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दररोज पोलिसांची महाविद्यालय परिसरावर आता नजर ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी महाविद्यालयाला रोज पेट्रोलिंग होणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. (प्र्रतिनिधी)पोलीस निरीक्षकांची ‘स्पॉट व्हिजिट...’बारामती ग्रामीणचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत कांबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, मी स्वत: महाविद्यालय परिसरात आज भेट दिली. दुपारी १२ आणि २ वाजता परिसराची पाहणी केली. त्यानुसार विद्या प्रतिष्ठान कॉर्नरसह चार ठिकाणी पोलिसांना ‘स्पॉट व्हिजिट’ करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार गैरप्रकार आढळल्यास संबंधित रोडरोमिओंना चोप देण्याच्या सूचना दिल्या आहेत. महाविद्यालयाच्या सुरक्षारक्षकांना देखील पोलीस कर्मचारी, अधिकाऱ्यांचे मोबाईल क्रमांक देण्यात आले आहेत. त्यानुसार महाविद्यालयाबाहेरील आणि परिसरात नाहक फिरणाऱ्या रोडरोमिओंची माहिती घेण्यात येत आहे. याशिवाय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना मोबाईल क्रमांक देण्यात आले आहेत. पोलिसी खाक्या दाखवूनच रोडरोमिओंना समज देण्यात येईल. त्यामुळे टवाळखोरीला पूर्णपणे लगाम बसेल.
पोलिसांनी पिंजून काढला महाविद्यालय परिसर
By admin | Published: July 28, 2016 3:55 AM