पुणे : शेअर रिक्षामध्ये बसलेल्या प्रवाशाला चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या तिघांना स्वारगेट पोलिसांनीअटक केली. प्रवाशांना लुटणाऱ्या या रिक्षाचा शोध घेत असताना त्या रिक्षाचे हुड हे पांढऱ्या रंगाचे व त्यावर पाठीमागे उंची वाढवा अशी जाहिरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या धाग्यावरुन पोलीस संशयितांपर्यंत पोहचले.सद्दाम मुस्तफा बिद्री (वय २७, रा. इंदिरानगर खड्डा, गुलटेकडी), समीर मुस्तफा शेख (वय २६, रा. पर्वती दर्शन) आणि समीर बाबुलाल बागवान (वय ३७, रा़ पर्वती दर्शन) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी संतोष बंडगर (वय २०, रा. कात्रज) यांनी फिर्याद दिली आहे़ हा प्रकार गेल्या रविवारी २० सप्टेंबर रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास स्वारगेट ते पर्वती दरम्यान घडला होता. संतोष बंडगर हा मुळचा सांगोला येथील असून तो पुण्यात ए सी रिपेअरिंगची कामे करतो. गणेशोत्सवात तो गावाला गेला होता. २० सप्टेंबरला तो गावाहून परत आला. घरी जाण्यासाठी स्वारगेट आऊटगेटला रिक्षात बसला. रिक्षात अगोदरच दोघे जण बसले होते़. कात्रजला जात असताना चालकाने रिक्षा राजमाता हॉस्पिटलच्या बोळात घातली. त्यानंतर पाठीमागे बसलेल्या प्रवाशाने संतोषचा हात पकडून ठेवला. रिक्षाचालकाने त्याच्या पोटाला चाकून लावून धमकावले व तिसऱ्याने त्याच्या खिशातील २ हजार रुपये, १३ हजार रुपयांचा मोबाईल काढून घेऊन त्याला रस्त्यावर सोडून ते पळून गेले होते. घाबरल्याने त्याने हा प्रकार कोणाला सांगितला नाही़. मित्रांनी मोबाईलबद्दल विचारणा केल्यावर त्यांनी झालेला प्रकार मित्रांना सांगितले. त्यानंतर त्याने पोलिसांकडे फिर्याद दिली.
यावेळी त्याने रिक्षाचे हुड पांढरे होते व पाठीमागे उंची वाढवा अशी जाहिरात असल्याची माहिती दिली होती. या माहितीवरुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवडी, शब्बीर सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुरेश जायभाय, हवालदार सज्जाद शेख, विजय खोमणे, सचिन दळवी, ज्ञाना बडे, मनोज भोकरे, शंकर गायकवाड यांनी रिक्षाचालकांकडून माहिती काढली. त्यात बिद्री आणि समीर शेख यांची नावे समोर आली. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर त्यांनी आपल्यासमवेत बागवान असल्याचे सांगितले़ तिघांना अटक करुन पोलिसांनी रिक्षा, मोबाईल, रोख रक्कम व चाकून जप्त केला आहे.