लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : औंध मध्ये दरोडेखोरांना पाहून पोलीस पळून गेल्याची घटना चर्चेचा विषय ठरली. या घटनेमधील सराईतासह दोघांना हडपसर पोलिसांनी पाठलाग करून पकडले. त्यांच्याकडून चारचाकी, दुचाकी आणि सोन्याचे दागिने असा १८ लाख १७ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. आरोपीवर चोरीचे ७० गुन्हे दाखल असल्याचे उघडकीस आले आहे.
सनीसिंग पापासिंग दुधाणी (वय २२) आणि सोहेल जावेद शेख (वय २१, दोघेही रा. गोसावी वस्ती, हडपसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहे. संघटित गुन्हेगारीच्या (मोक्का) गुन्ह्यात फरार असलेल्या सनीसिंगवर सुमारे ७० गुन्हे दाखल आहेत. दोन्ही आरोपींनी या वर्षांत केलेले तब्बल १२ चोरी आणि घरफोडीचे गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील वाहन चोरी, जबरी चोरी घरफोडीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करून गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टीने हडपसर पोलीस ठाण्यातील तपास पथकातील अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड, सौरभ माने व पोलीस अंमलदार हे मंगळवारी दुपारी गस्त घालत होते. त्यावेळी पथकातील पोलीस नाईक आणि पोलिस शिपाई यांना खब-यामार्फत सनीसिंग आणि शेख त्यांच्या अल्पवयीन साथीदाराबरोबर बिराजदारनगर येथील कॅनॉलजवळ फिरत असल्याचे समजले.
दरम्यान, पोलीस संबंधित ठिकाणी गेल्यानंतर पोलिसांनाही ते दुचाकीवरून फिरताना आढळून आले. दरम्यान पोलिसांनी सनी सिंगला थांबण्यास सांगूनही तो थांबला नाही. परंतु, यावेळी पळून जाताना दोघांनाही पाठलाग करून पोलिसांनी अटक केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण कदम, निरीक्षक राजू अडागळे, दिगंबर शिंदे, सहायक निरीक्षक हनुमत गायकवाड, उपनिरीक्षक सौरभ माने, अंमलदार प्रदीप सोनवणे, प्रताप गायकवाड, गणेश क्षीरसागर, नितीन मुंडे, समीर पांडुळे, अविनाश गोसावी, पोलिस शिपाई अकबर शेख, प्रशांत टोणपे, शाहीद शेख, प्रशांत धुमाळ यांच्या पथकाने ही कारवाई केली.
दरम्यान, अटक आरोपींचा साथीदार अमरसिंग टाक (वय २५) हा अद्याप फरार आहे. चोरलेल्या दागिन्यांपैकी काही मुद्देमाल टाक यांच्याकडे आहे. त्यांना गुन्हा करण्यास कोणी मदत केली याचा तपास करायचा असल्याने व आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील किरण बेंडभर यांनी केली.न्यायालयाने आरोपींना १७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.