इंदापूर (पुणे) : लातूर, उस्मानाबाद, बीड जिल्ह्यांत चोरी, घरफोडीसारखे गुन्हे दाखल असणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांचा पाठलाग करत इंदापूरच्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना जेरबंद केले. गुरुवारी (दि. १२) ही घटना घडली. यावेळी त्या दोघांकडून चोरी केलेली एक दुचाकी ही पोलीसांनी जप्त केली. सुमित दगडु गर्गेवाड (वय २३ वर्षे रा. मळवटी रोड, सिध्देश्वरनगर, लातूर), शंभु विक्रम बुधवाडे (वय २० वर्षे रा. बाभुळगाव ता. बाभुळगाव जि. लातूर) अशी आरोपींची नावे आहेत.
हवालदार प्रवीण भोईटे, पोलीस कर्मचारी प्रवीण शिंगाडे, समाधान केसकर अशी आरोपींना जेरबंद करणाऱ्या पोलीस कर्मचा-यांची नावे आहेत. हवालदार भोईटे यांनी या प्रकरणी फिर्यादी दिलेली आहे.आरोपींविरुध्द मुंबई पोलीस ॲक्ट कलम १२२ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री हवालदार भोईटे व त्यांचे सहकारी रात्रीची गस्त घालत असताना दहा वाजण्याच्या सुमारास पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या महतीनगर भागात दोघे जण अंधारात संशयास्पदरित्या फिरत असताना, त्यांना आढळले. पोलिसांची चाहूल लागताच ते पळून जावू लागले. त्यावरुन ओळख लपवून गुन्हा करण्याच्या उद्देशाने ते फिरत असल्याची पोलिसांची खात्री पटली. त्यांनी पाठलाग करुन त्यांना पकडले. वैभव अशोक शेंडे,अतुल बलभीम आरणे, प्रताप बाबासाहेब भोईटे यांनी त्यासाठी सहकार्य केले.
चौकशीत आरोपींची नावे समजली. त्यांनी अंधारात लपवलेली दुचाकी (क्र.एम एच २४ बी क्यू ९२ २०) पोलिसांनी जप्त केली आहे. पोलीस नोंदी तपासल्या असता, आरोपी सराईत गुन्हेगार आहेत त्यांच्यावर लातूर, उस्मानाबाद, बीड अशा जिल्ह्यांमध्ये चोरी, घरफोडी बाबतचे गुन्हे दाखल आहेत, असे स्पष्ट झाले.