विमाननगर : पोलीस पत्नीच्या निर्घृण खुनाच्या गुन्ह्यातून सबळ पुराव्याअभावी सुटलेल्या माथेफिरू पोलिसाने शेजा-याच्या डोक्यात दगड मारून गंभीर जखमी केल्याचा गंभीर प्रकार वडगावशेरी येथे घडला. याप्रकरणी जामिनावर बाहेर आल्यावर पुन्हा धमकावल्याप्रकरणी या माथेफिरू पोलिसाच्या निलंबनाचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिल्याची माहिती पोलीस निरीक्षक शंकर खटके यांनी दिली. श्रेयस साळवी (वय 38, रा.विश्रांतवाडी) या माथेफिरू पोलिसाने मंगळवारी 12 नोव्हेंबर रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास सासरवाडी शेजारी राहणारे संदीप रसाळ (वय 36, रा.राजश्री काॅलनी वडगावशेरी) यांना जुन्या भांडणाचा राग मनात ठेवून पार्किंगमध्ये शिरून दगडाने डोके फोडले. या मारहाणीत त्यांच्या पत्नी व आईचे मंगळसूत्र तुटले. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी त्याला रात्रीच ताब्यात घेऊन अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली. दरम्यान, साळवी याने पुन्हा रसाळ यांच्या इमारतीखाली जाऊन त्यांना धमकावले. साळवी यांच्या कुटुंबीयांनी तो त्यांना देखील त्रास देत असून, मानसिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यासाठी चंदननगर पोलिसांना मदत मागितली होती. त्यानुसार त्याला मानसिक उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक शंकर खटके यांनी दिली.>कोण आहे श्रेयस साळवी.......श्रेयस साळवी हा शहर पोलीस दलात शिपाई असून, त्याने महिला पोलीस रुपाली साळवी हिचा ऑक्टोबर 2013 रोजी निर्घृण खून केला होता. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्यात त्याला अटक केली होती. मे 2016 मध्ये न्यायालयाने त्याची सबळ पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली. या विरोधात विश्रांतवाडी पोलिसांनी जुलै 2016 मध्ये अपील दाखल केले होते. दाखल करण्यास पात्र नाही म्हणून उच्च न्यायालयाने अपील रद्द केले. न्यायालयातून सुटका झाल्यावर त्याला पोलीस दलात पुन्हा सामावून घेण्यात आले. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून तो मुख्यालयातून कोर्ट आवारात काम करीत होता. गेल्या महिनाभरापासून तो कामावर हजर नव्हता. पोलीस पत्नीच्या निर्घृण खुनासह या माथेफिरू पोलिसाने अनेक गुन्हे केल्याचे समजते. वडगावशेरी येथील मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर पसरला. या गुन्ह्यासह साळवीचे माथेफिरू पराक्रम लक्षात घेऊन पुन्हा एकदा पुणे शहर पोलीस आयुक्तांनी त्याला निलंबित करण्याचे आदेश दिले.
'त्या' माथेफिरू पोलिसाच्या निलंबनाचे पोलीस आयुक्तांचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2019 12:44 AM