पुणे : समर्थ पोलिस ठाण्याच्या हद्दीत गंभीर गुन्हे करणाऱ्या अमन युसुफ पठाण ऊर्फ खान टाेळीवर पुणे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी माेक्का कायदा अंतर्गत कारवाई केली आहे. अमन पठाण (२३) व त्याचे साथीदार आवेज अश्पाक शेख (२२, रा. गणेश पेठ) आणि स्वप्नील प्रशांत शिंदे (१९, रा. धनकवडी) अशी कारवाई झालेल्या आराेपींची नाव आहे. पोलिस आयुक्तांनी केलेली ही ४९ वी कारवाई आहे.
आराेपी युसुफ पठाण व त्याच्या साथीदारांनी ५ जुलै राेजी तक्रारदार यांना यापूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून रिक्षातून खाली उतरवले. त्यानंतर आवेजने त्याच्या हातातील धारदार हत्यार मारून जिवे मारण्याच्या उद्देशाने तक्रारदार यांच्या डाव्या हाताच्या पाेटरीवर मारून त्यांना गंभीर जखमी केले हाेते. याप्रकरणी खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी आराेपींवर समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला हाेता.
टाेळी प्रमुख अमन पठाण हा त्याच्या अन्य सदस्यांना सोबत घेत त्याच्या प्रत्येक गुन्ह्यात सहभागी करून घेत होता, तसेच काही नवीन साथीदार साेबत घेऊन स्वत:ची संघटित टाेळी तयार करुन स्व:तचे टाेळीवर वर्चस्व निर्माण करण्यासाठी गुन्हे करत हाेता. त्यात खुनाचा प्रयत्न करणे, धारदार हत्यारे जवळ बाळगणे, दहशत निर्माण करणे यासारखे गंभीर गुन्हे त्याने वारंवार केले आहेत.
त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करुन सुध्दा त्याने पुन्हा पुन्हा गुन्हे केले असल्याने, संघटितपणे दहशतीच्या मार्गाने बेकायदेशीरपणे स्वत:चे वर्चस्व निर्माण करण्यासाठी गुन्हे केल्याचे दिसून आले. तसेच त्यांच्या वर्तनात सुधारणात हाेत नसल्याने आराेपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१) (२) व ३ (४) नुसार कारवाई करण्याचा प्रस्ताव समर्थ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश शिंदे यांनी पोलिस उपायुक्त संदिपसिंह गिल यांच्या मार्फत अपर पोलिस आयुक्त प्रविणकुमार पाटील यांच्याकडे सादर केला होता. याप्रकरणाची छाननी करुन त्यांनी मान्यता दिल्यावर या प्रस्तावाला पोलिस आयुक्तांनी मंजूरी दिली.