- किरण शिंदे
पुणे : अठरा वर्षीय तरुणाचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण करत चेहरा विद्रूप केल्याप्रकरणी निखिल विजय कुसाळकर त्याच्या साथीदारांविरोधात चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर या प्रकरणी आता मोठी कारवाई करण्यात आली असून निखिल कुसाळकर आणि त्याच्या पाच साथीदारांविरोधात मोक्का कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी आतापर्यंत पुणे शहरातील ९६ टोळ्यांवर मोक्का (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) कायद्यानुसार कारवाई केली आहे.
टोळीप्रमुख निखिल विजय कुसाळकर (वय २२), अभिजीत उर्फ प्रफुल्ल बबन चव्हाण (वय २१), सुबोध अजित सरोदे (वय २०), ओमकार सोमनाथ हिंगाडे (वय २२), अयाज रईस उर्फ रईसद्दीन इनामदार (वय १९) कल्पेश उर्फ पाकुळी रमेश कराळे अशी मोका कायद्यानुसार कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत. ओमकार हिंगाडे याला अटक करण्यात आली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
आरोपी निखिल कुसाळकर याने स्वतःची संघटित टोळी तयार केली आहे. त्याच्या या टोळीकडून अवैध मार्गाने आणि इतर फायदे मिळवण्यासाठी दरोडा, दरोड्याचा प्रयत्न, ठार मारण्याच्या उद्देशाने अपहरण, गंभीर दुखापत, नागरिकांच्या मालमत्तेची तोडफोड करून नुकसान करणे, बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगणे, पोलिसांच्या आदेशाचा भंग करणे, यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे वारंवार केले आहेत. त्याच्यावर वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करून देखील त्याने पुन्हा पुन्हा गंभीर गुन्हे केले आहेत. दरम्यान निखिल कुसाळकर टोळीची गुन्हेगारी स्वरूपाची पार्श्वभूमी पाहता त्याच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी सादर केला होता. या प्रस्तावाची छाननी करून कुसाळकर आणि त्याच्या पाच साथीदार विरोधात मोक्का नुसार कारवाई करण्यात आली आहे.