पुणे : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या बंगल्यासमोर मोबाइलवर चित्रीकरण करून बंदोबस्तावरील पोलिस हवालदाराशी अरेरावी केल्याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी एकाला अटक केली. ही घटना कोथरूडमधील महात्मा सोसायटीत शनिवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास घडली. याप्रकरणी सचिन कुदळे (वय ४२, रा. महात्मा सोसायटी, कोथरूड) याला अटक केली आहे. सचिन कुदळे याच्यावर एकूण तीन गुन्हे दाखल केले आहेत. याप्रकरणी एका महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिस हवालदार सचिन सोनवणे यांनी कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या बंगल्यासमोर कुदळे आणि एक महिला हे दाेघे थांबले. त्यावेळी बंदोबस्तावरील पोलीस हवालदार सोनवणे यांनी त्यांच्याकडे विचारणा केली असता कुदळे याने हवालदार सोनवणे यांच्याशी हुज्जत घालून मोबाइलवर चित्रीकरण केले. संबंधित ध्वनिचित्रफीत प्रसारित केली. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी कुदळे याच्यासह एका महिलेविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिस उपनिरीक्षक माळी तपास करत आहेत.
सोशल मीडियावर तेढ निर्माण प्रकरणी गुन्हा
सोशल मीडियावर महापुरुषांविषयी आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करून समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी सचिन कुदळे याच्या विरोधात आणखी एक गुन्हा कोथरूड पोलिसांनी दाखल केला आहे. याबाबत अभिषेक कांगणे (वय २५) याने फिर्याद दिली. कुदळे याने त्याच्या सोशल मीडियावरील खात्यावर मजकूर प्रसारित करून समाजात तेढ निर्माण केल्याचे कांगणे याने फिर्यादीत म्हटले आहे. सुनील हिंगणे यांनी वारजे पोलिस ठाण्यात आणखी एक फिर्याद दिली आहे. त्यानुसार सचिन कुदळे याने फेसबुक व व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित करून त्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविषयी आक्षेपार्ह उल्लेख करून भाजप कार्यकर्त्यांमध्ये असंतोष व द्वेषाची भावना निर्माण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.