पुणे : पुण्यातील नामवंत सिंहगड रोड पोलीस ठाण्यात दोन अधिकाऱ्यांमध्ये "मलईवरून" झालेल्या वाद जगजाहीर झाल्यानंतर आता याप्रकरणातल्या बंद दाराआड पण सर्वांसमक्ष घडलेल्या धक्कादायक बाबी समोर येऊ लागल्या आहेत. कलेक्टरने या पोलीस ठाण्यातील थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांना मलई गोळा करण्यावरून खडेबोल सुनावल्याचे आता समोर आले आहे. मलई गोळा करण्यावरून धुसफूस सुरू झाल्यानंतर त्याने "मी कुणालाच हे काम करू देणार नाही" अशी धमकीच वरिष्ठ दिली होती. याप्रकरणात आता संबंधित कर्मचाऱ्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निलंबन केले आहे. त्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. श्रीधर जनार्दन पाटील असे निलंबित केलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे.
सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गेल्या महिन्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांच्यात मलईवरून वादावादी झाल्याचे प्रकरण घडले होते. त्यानंतर हे प्रकरण अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कानावर गेले होते. तर पोलीस दलात देखील याची जोरदार चर्चा झाली होती. तत्पूर्वी याप्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या पोलीस ठाण्यात असणाऱ्या एका पोलीस उपनिरीक्षकाचे उचल बांगडी केली. तर नुकतीच वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांची देखील उचलबांगडी करत विशेष शाखेत त्यांची बदली करण्यात आली.
दरम्यान याप्रकरणात आता खात्याअंतर्गत चौकशी केल्यानंतर आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. मलईवरून पोलीस निरीक्षक आणि कर्मचाऱ्यामध्येही धुसफूस सुरू असल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे. कारण, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाटील याच्याकडून अवैध धंद्याची वसुली बंद केल्यानंतर नाराज झालेल्या पाटील यांनी थेट " मी कुणालाच हे काम करू देणार नाही" अशी धमकीच वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली.
त्यावरून हद्दीत अवैध धंद्यांना प्रोत्साहन देत त्यांच्याकडून वसुली करत असल्याचे सिद्ध होत आहे. तर पाटील आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये देखील वाद झाले. ते वाद सर्वसामान्य नागरिक आणि पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसमोर झाले असल्याचे चौकशीतुन समोर आले आहे. त्यामुळे हे निलंबन करण्यात आले आहे.