टाकळी हाजी : शिरूर पोलीस ठाण्यामधील पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र केशव मांडगे यांच्यावर लाचलुचपत विभागाने, लाच स्वीकारल्याच्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. लाचलुचपत खात्याच्या पथकाने सिनेस्टाईल पाठलाग करूनही, मांडगे मात्र पळून जाण्यास यशस्वी ठरला आहे.याबाबत लाचलुचपत खात्याचे पोलीस निरीक्षक अरुण दत्तू घोडके यांनी मांडगे यांच्याविरोधात शिरूर पोलीस ठाण्याला लाच स्वीकारणे, तसेच शासकीय कामात अडथळा आणून पळून जाणे, असा कलम ३५३, २७९ सह भ्रष्टाचार प्रतिबंध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत फिर्यादी पोलीस निरीक्षक अरुण घोडके यांनी फिर्यादीमध्ये दिलेल्या माहितीनुसार : सुनील अशोक घावटे (रा. पाषाणमळा, शिरूर) भीमा नदीवर रांजणगाव सांडस येथे वाळू काढत होते. त्यांचा ट्रॅक्टर पोलीस कॉन्स्टेबल मांडगे यांनी पकडला होता. त्यानंतर मला प्रत्येक महिन्याला पंचवीस हजार रुपये दे. नाही तर तुझी तक्रार तहसीलदारांना करून, तुझ्यावर खोटा गुन्हा दाखल करीन, अशी धमकी देत होते. त्यामुळे घावटे यांनी खोट्या तक्रारीच्या भीतीने १८ हजार ५०० रुपये देण्याची तडजोड केली. मात्र मांडगेच्या सततच्या त्रासामुळे घावटे यांनी लाचलुचपत विभागात तक्रार दाखल केली. या तक्रारीची दखल घेत लाचलुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक अरुण घोडके यांनी तक्रारदारांसह पोलीस कॉन्स्टेबल व अधिकाऱ्यांना घेऊन शिरूरबाहेरून जाणाºया पुणे-नगर रस्त्यावर बायपास येथील एचपी पेट्रोल येऊन थांबले. तक्रारदार घावटे यांनी फोन करून मांडगेंना बोलावून घेतले.मांडगे स्विफ्ट गाडी (एमएच १२ पीटी ५१५१) या गाडीतून येऊन घावटे यांच्याकडून पेसे घेतले. मात्र सापळा रचल्याचे लक्षात येताच त्यांनी धूमस्टाईलने गाडी पळविली. त्यांचा पाठलाग अधिकाऱ्यांनी केला, मांडगेला विद्याधामजवळ अडून गाडी थांबबा, असे सांगितले. अधिकारी गाडीची चावी काढून घेण्याच्या प्रयत्नात असतानाच मांडगेनी सिनेस्टाईल गाडी पळून नेण्यात यशस्वी ठरला. मात्र याबाबत पुरावे असल्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास पोलीस निरीक्षक अरुण घोडके करीत आहेत.शिरूरमधील मोठ्या प्रमाणात सुरू असलेली वाळूतस्करी व अवैध धंद्याबाबत ‘लोकमत’ने आवाज उठविला. गेल्या आठवड्यात टाकळी हाजी पोलिसांनी पकडलेल्या पाच वाळूचे ट्रक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या इशाऱ्यावर सोडून देण्यात आले. त्या वाळूतस्करांची बिदागी मांडगेच्या माध्यमातून वरिष्ठांपर्यंत पोहोचत असल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे. मांडगे याच्याबद्दल मोठ्या प्रमाणात तक्रारी होत्या. तो अवैध धंदेवाल्यांना खोट्या गुन्ह्याची धमकी देऊन पैसै उकळत असे, अशी चर्चा आहे. एका जेसीबीकडून २५ हजार, तर ट्रककडून पाच हजार याप्रमाणे कार्ड असून, तालुक्यातील सर्व नद्या, ओढे हे पैसे कमाविण्याचे अड्डाच झाला होता. तालुक्यात सध्या ५०ते ६० ठिकाणी उपसा सुरू असून, रोज शेकडो ट्रक वाळूवाहतूक होती. यांची वसुली मांडगेमार्फतच चालत असल्याची चर्चा आहे. मांडगे यांनी लाखो रुपये महिन्याला घेऊन ते कोणा-कोणापर्यंत पोहोचते होतात, याची चौकशी होण्याची मागणी जनतेमधून केली जात आहे. मांडगे यांच्या फोनमधील कॉल डिटेल्स घेतल्यास, पोलीस खात्याबरोबरच महसूलशी असलेली सलगीही उघड होऊ शकते, अशी चर्चा पोलीस व महसूलमध्ये रंगली आहे.
पोलिसांच्या कार्यभारावर प्रश्नचिन्ह...शिरूर तालुक्यात वाळूतस्करी मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे ‘लोकमत’ने मांडलेली अवैध धंद्याबाबत सत्यता दिसू लागली आहे. कॉन्स्टेबल मांडगेवर लाचलुचपत विभागाने गुन्हा दाखल केल्यामुळे पोलिसांच्या कार्यभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यासह तालुक्यात या चर्चेला उधाण आले आहे.