पुणे : जमिनीच्या आर्थिक वादातून बांधकाम व्यावसायिक राजेश कानाबार यांच्यावर गोळीबार करून त्यांचा खून केल्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार व इतरांबरोबर हॉटेलमध्ये बैठक घेणाऱ्या चंदननगर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदाराला निलंंबित केले. पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनी हा आदेश दिला आहे.
परमेश्वर तुकाराम सोनके असे निलंबित केलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. ही घटना जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील एसबीआयच्या प्रवेशद्वाराजवळ ५ ऑक्टोबर रोजी दुपारी पावणेतीनच्या सुमारास घडली होती. बावधन ब्रुद्रक येथील येथील जमिनीचा निकाल कानाबार यांच्या बाजूने लागणार असल्याचा अंदाज असल्याने आरोपींना हा गुन्हा केल्याचे फिर्यादीत नमूद केला आहे.
कानाबार यांच्या खुनासाठी राजेश शामलाल साळुंके (वय ३८, रा. सुखसागरनगर, कात्रज) याने मारेकऱ्याला पिस्तूल आणि काडतुसे पुरविल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. तो व त्याचा साथीदार राकेश रमेश बुरटे (वय ३६, रा. जनता वसाहत, पर्वती) खुनाचे मुख्य सूत्रधार असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. त्यांच्यासह सनी अशोक वाघमारे (वय २६, रा. वाघोली), रोहित विजय यादव (वय १९, रा. सुखसागरनगर, कात्रज), गणेश ज्ञानेश्वर कुऱ्हे (वय ३६), राहुल आनंदा कांबळे (वय ३६), रुपेश आनंदा कांबळे (वय ३८), हसमुख जसवंतभाई पटेल (वय ३१) यांच्यावर याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
राजेश कानाबार यांच्यावर गोळीबार करून त्यांचा खून केल्यानंतर गुन्ह्यातील आरोपी राजेश साळुंके, राकेश बुरटे, रोहित यादव यांच्यासोबत पोलीस हवालदार परमेश्वर सोनके हा चंदनगर येथील एका हॉटेलमध्ये बैठकीस रात्री साडेनऊ वाजता बसल्याचे सीसीटीव्हीच्या विश्लेषणावरून निष्पन्न झाले आहे. आरोपी आणि सोनके हे त्या ठिकाणी बसल्याबाबत हॉटेलचालकानेही दुजोरा दिला आहे. सोनके याच्या संपर्कात आरोपी आले असतानाही, त्याने आरोपींना पोलिसांसमोर हजर न करता पोलिसांना कोणतीही माहिती दिली नाही. सोनके याने आरोपींना मदत करण्याच्या हेतूने कृत्य केल्याने, पोलीस दलाची शिस्त मलिन केल्याने, पोलीस शिस्तीस बाधा आणणारे असल्याने आरोपींना मदत करणारे असल्याने निष्काळजीपणा व बेजबाबदारपणाने गैरवर्तन केल्याप्रकरणी निलंबनाचे आदेश काढले आहेत.