लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठ्या प्रमाणावर सामना करावा लागत आहे. शहरात सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंतच जीवनावश्यक वस्तूंची दुकाने खुली ठेवली आहेत. मात्र, तरीही याव्यतिरिक्त गेल्या काही दिवसांपासून रस्त्यावर वाहने आणि नागरिकांच्या संख्येत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. नागरिक खोटी कारणे सांगून घराबाहेर पडत असल्याने पुणे पोलिसांनी गुरुवारपासून (दि. ६) शहरात कडक नाकाबंदी सुरू केली आहे. त्याच्या परिणास्वरूप कारवाईचा आकडा प्रतिदिन ४ ते ५ हजारांच्या आसपास जात असल्याची माहिती पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिली. यापुढील काळात नागरिकांकडून दिल्या जाणाऱ्या प्रत्येक कारणाची तपासणी केली जाणार असून, वैध कारण असेल तरच सवलत दिली जाणार असल्याचेही ते म्हणाले.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आाठवड्यातले पाच दिवस सकाळच्या चार तासांच्या वेळेत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे, तर शनिवार आणि रविवार दोन्ही दिवस कडक ‘वीकेंड लॉकडाऊन’ आहे.
पोलीस दलातले वरिष्ठ अधिकारी रस्त्यावर उतरले आहेत. खोटी कारणे देऊन बाहेर पडणाऱ्या नागरिकांची हयगय केली जाणार नसल्याचा इशारा देण्यात आला आहे. डॉ. शिसवे म्हणाले, आमचा उद्देश नागरिकांना त्रास देण्याचा मुळीच नाही. पण एक वेळ अशी होती, की कोरोना पॉझिटिव्हची संख्या ७ हजारांपर्यंत पोहोचली होती. रुग्णसंख्या वाढली की मृत्यूचे प्रमाणही वाढते. आजही मृत्यूंची संख्या ८५ आहे.
-----------------
गुरुवारपासून कडक कारवाई सुरू केली आहे. कोंढवा परिसरात काही कारवाई होत नव्हती. आज २५० कारवाया होत आहेत. आम्ही सरसकट लोकांना अडवत नाही, पण त्यासाठी वैध कारण असले पाहिजे. कारवाई करणे हे आमचे धोरण नाही. पण कारवाईच्या भीतीने का होईना नागरिक नियमांचे पालन करतील तेच आम्हाला हवे आहे. नागरिकांना गांभीर्य कळायला हवे. शहरात पूर्वी अनेक भागांमध्ये आम्ही फिरायचो. तेव्हा १० ते १२ कारवाया व्हायच्या. पण आज एकेका पॉईंटवर ११० कारवाया होत आहेत.
------------------------------