बारामती : उजनी धरणक्षेत्रामध्ये अवैध वाळू उपसा करणाऱ्यांना इंदापूरपोलिसांनी दणका दिला आहे. अवैध वाळू उपशाप्रकरणी तीन आरोपींना ६ महिन्यांसाठी तडीपार करण्यात आलं आहे. तसेच अनेक गुन्हेगारांच्या कुंडल्या तयार करण्यात आल्या असून या पुढील काळात कारवाईमध्ये सातत्य ठेवण्यात येणार असल्याचे इंदापूरपोलिस ठाण्याच्या वतीने सांगण्यात आले.
इंदापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश नंदु जगताप (वय २८ वर्षे रा. हिंगणगाव ता. इंदापुर), सौदागर बाळासाहेब ननवरे (वय २९ वर्षे रा. कांदलगाव ता. इंदापूर), (सुरक्षित वंसत रांखुडे वय ३१ वर्षे रा. कांदलगाव ता.इंदापुर ) तडीपार केलेल्या आरोपींची नावे आहेत. इंदापुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उजनी जलाशयातुन रात्री अपरात्री बेकायदा वाळुची तस्करी करणे, वाहतूक करणे आदी प्रकार घडून येत होते. तसेच गावातील गुंड प्रवृत्तीच्या व्यक्ती एकत्र जमवून करून गावात मारमारी करणे, अशा व्यक्तींची माहिती इंदापूर पोलिसांच्या वतीने घेण्यात आली होती. त्या पैकी योगेश जगताप यांच्या टोळीवरील गन्ह्यांची तपासणी केली.
यामध्ये जगताप टोळी इंदापूर तालुक्यातील कांदलगाव, हिंगणगाव, इंदापूर शहर व तालुक्यातील इतर ठिकाणी त्याचे साथीदार रात्री उजनी धरणामधून वाळू उपसा करीत असल्याचे निदर्शनास आले. तसेच बेकायदा जमाव जमवून मारामरी करणे, असे गंभीर प्रकार घडत होते. मात्र भीतीपोटी त्याच्या विरूद्ध तक्रार करण्यात कोणीही पुढे येत नव्हते. त्यामुळे पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक यांच्याकडे या आरोपींविरूद्ध इंदापूर पोलिसांनी तडीपारीचा प्रस्ताव पाठविला होता. पुणे ग्रामीण पोलिसांच्या आदेशानुसार जगताप व त्याच्या साथीदारांना पुणे जिल्हयातील इंदापूर, दौंड तसेच अहमदनगर जिल्हयातील कर्जत, जामखेड व सोलापुर जिल्हयातील करमाळा या तालुक्यातुन ६ महिने कालवधी करीता तडीपार करण्यात आले आहे. तडीपार करण्यात आलेल्या तालुक्यांतील रहिवाशांना इंदापूर पोलिसां तर्फे तडीपार केलेल्या हद्दीत हे आरोपी अढळून आल्यास इंदापूर पोलीस ठाण्याला माहिती द्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. तसेच माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा बाधा आणणाऱ्या, अवैध वाळू उपसा करणाऱ्या अंदाजे ५० ते ६० लोकांच्या कुंडल्या तयार ठेवण्यात आल्या आहेत. त्यांच्यावर देखील मोका अथवा तडीपारी अंतर्गत कारवाई करण्याचा इशारा इंदापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक टी. वाय. मुजावर यांनी दिला आहे.