पुणे : पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला एकीकडे नागरिकांना न्याय देण्याचे ‘धडे’ देत असतानाच एका अधिका-याच्या उदासिन वृत्तीमुळे एक खून अकस्मात मृत्यू म्हणून नोंदवला गेल्याचे प्रकरण समोर आले आहे. ससूनच्या डॉक्टरांनी यासंदर्भात अहवाल दिल्यानंतरही तपास न करता हे प्रकरण दडपण्यात आल्याची चर्चा आहे.गेल्या आठवड्यात विमाननगर भागातील दत्त मंदिर चौकामध्ये एक ५०-५५ वर्षीय व्यक्ती बेशुद्धावस्थेत आढळून आली होती. माहिती मिळताच एक पोलीस उपनिरीक्षक घटनास्थळी धावले. त्यांनी तातडीने ‘वरिष्ठ’ पोलीस अधिका-याला याची माहिती दिली. मात्र, त्यांनी उपनिरीक्षकालाच मृतदेहाचे शवविच्छेदन करुन घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार ससून रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. डॉक्टरांनी दिलेल्या अहवालात मृत्यूचे कारण ‘मल्टीपल इन्जुरी’ असे दिले. ज्याठिकाणी या व्यक्तीचा मृतदेह आढळून आला त्या भागात अनेकजणांचा सतत वावर असतो. काही नागरिकांनी हा खुनाचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला होता. मात्र, पोलीसांनी त्याकडे दुर्लक्ष केले. काही जणांनी ही व्यक्ती इमारतीवरुन खाली पडल्याचे सांगितले. परंतु त्याच्या शरीरावर कुठेही खाली पडल्याच्या जखमा दिसत नव्हत्या. त्याला अंतर्गत जखमा झालेल्या असल्याचे डॉक्टरांनी सांगितलेले होते. ससूनच्या डॉक्टरांनी दिलेल्या अहवालावरून तपास का करण्यात आला नाही हा प्रश्न आहे. खातरजमा न करताच मृतदेह दिला ताब्यातशवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह त्याच्यासोबत काम करणा-या काही जणांच्या ताब्यात देण्यात आला. या व्यक्तींची खातरजमा करण्यात आली नाही की त्यांचे नाव पत्ते घेण्यात आले नाहीत. ही माणसे त्याची नातेवाईक असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत असले तरी त्याबाबत खात्रीशीर माहिती पोलिसांकडे नाही.
पोलिसांनी दडपला खुनाचा गुन्हा?
By admin | Published: April 15, 2016 3:49 AM