पुणे : सहकारी गृहरचना संस्थेचे बनावट लेखा परीक्षण केल्याप्रकरणी तत्कालीन लेखापरीक्षकास मार्केटयार्ड पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने आरोपीस १७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
रवींद्र चंद्रकांत गायकवाड (वय ३७ रा. इंदिरानगर बिबबेवाडी) असे पोलीस कोठडी सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या विरोधात राजेश भुजबळ (वय ५४, रा. वाकड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम तसेच आयकर अधिनियम अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी गायकवाड याने गुलटेकडी भागातील अरिहंत सहकारी गृहरचना संस्था मर्यादित या संस्थेचे सन २०१३-१४ या वर्षाचे लेखा परीक्षण करून बनावट लेखापरीक्षण अहवाल दिला होता. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी तपास करीत संस्थेचे कार्याध्यक्ष व सचिव व यांच्याकडून गुन्ह्याकरिता वापरलेले ९२ व्हाउचर व इतर दस्तऐवज जप्त केले आहेत.
आरोपीने बनावट लेखापरीक्षण का केले यासाठी त्यांना आर्थिक फायदा झाला आहे का? गृहरचना संस्थेमध्ये आर्थिक गैरव्यवहार असतानाही संस्थेचे लेखापरीक्षण अहवाल ‘अ’ वर्ग कसा दिला? तसेच आरोपी गायकवाड याने तत्कालीन अध्यक्ष आणि सचिव राहिलेल्या आरोपी सोबत संगणमत करून संस्थेच्या रकमेचा अपहार केला आहे का? याबाबत तपास करण्यासाठी सरकारी वकील संजय दीक्षित यांनी आरोपीस पोलीस कोठडी देण्याची मागणी केली ती मान्य करीत न्यायालयाने आरोपीस १७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.