पुणे : विश्रांतवाडी परिसरात मुख्य चौकात सर्रासपणे चालणाऱ्या मटका अड्ड्यावर थेट पोलिस आयुक्तांच्या आदेशाने कारवाई करण्यात आली. विश्रांतवाडी स्थानिक पोलिसांकडून अवैध धंद्यावर कारवाई होत नसल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी येरवडा विभागाचे सहायक आयुक्त डॉ.शिवाजी पवार यांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. येरवडा पोलिस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांनी या मटका धंद्यावर धाड टाकून जेसीबीने जमीनदोस्त करून टाकला.या कारवाईत रोख रक्कम 22 हजार 820 रुपये ,3 मोबाईल आणि जुगार खेळणाऱ्या आठ जणांना अटक केली.या मोठ्या कारवाईमुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.
याप्रकरणी सिकंदर पापासिंग घमंडे (वय.४२,रा.भाट वस्ती,लोहगांव),प्रशांत सुनील डोळस (वय.३८,रा.विश्रांतवाडी),सुभाष रामचंद्र साळवी (वय.४३,विश्रांतवाडी),आशिष घेवानंद गायकवाड (वय.२०,रा.सर्व्हे नं.११२,विश्रांतवाडी),तानाजी चंदू कांबळे (वय.५८,रा.निंबाळकर नगर,लोहगांव),शामराव शंकर जगताप (वय.५२,रा.साठे वस्ती, लोहगांव),नारायण शांताराम गायकवाड (वय.४६,रा.देहूफाटा) आणि शिवमुद्र शिवाप्पा दंडमणी ( वय.५६,रा.महालक्ष्मी विहार,विश्रांतवाडी) यांना अटक करण्यात आली. येरवडा पोलीस ठाण्यातील कर्मचारी विष्णू सरवदे यांनी फिर्याद दिली आहे. हा मटका धंदा चालविणारे हितेश कांबळे आणि सुमित कांबळे हे फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे.
विश्रांतवाडी परिसरात अनेक ठिकाणी अवैध धंदे राजरोसपणे सुरु आहेत. स्थानिक पोकिसांकडून ठोस कारवाई होत नसल्याने काही महिन्यांपूर्वी थेट अतिरिक्त पोलिस आयुक्त सुनिल फुलारी यांनी अवैध धंदे करणारा सराईत तडीपार गुंड्याच्या मटका अड्ड्यावर छापा टाकून लाखो रुपयांची रोकड आणि मोठ्याप्रमाणावर गांजा जप्त केला होता. त्यानंतर काही काळ विश्रांतवाडी हद्दीतील अवैध धंदे बंद झाले होते. पण पुन्हा थोड्याच दिवसात पुन्हा अवैध धंदे चोरून लपून सुरू झाले. याबाबत अनेक तक्रारी करून देखील विश्रांतवाडी पोलिसांनी त्याची दखल घेतली नाही. विश्रांतवाडी धानोरी रोडवर मुख्य चौकात पत्र्याच्या शेडमध्ये जुगार धंदा खुलेआम सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना समजली. येरवडा विभागाचे सहायक पोलिस आयुक्त शिवाजी पवार यांच्या नेतृत्वाखाली येरवडा पोलिसांनी या मटका धंद्यावर शनिवारी सायंकाळी छापा टाकला. यावेळी 3 मोबाईल आणि रोख रक्कम तेवीस हजार व जुगाराचे साहित्य असा मुद्देमाल जप्त करून आठ जणांना अटक करण्यात आली.त्यानंतर जेसीबीच्या मदतीने मटका धंद्याचे पत्र्याचे शेड जमीनदोस्त केले.
या मटका धंद्याला पोलिसांचे अभय असल्यामुळे अनेकदा तक्रारी करून देखील कारवाई होत नसल्याची चर्चा होती. शहरातील सर्व अवैध धंदे बंद करण्याचे आदेश पोलिस आयुक्तांनी दिले.तरीदेखील चोरीछुप्या मार्गाने विश्रांतवाडीत मटका धंदा सुरूच होता. याची गंभीर दखल घेत हि कारवाई करण्यात आली.