- रोशन मोरे
पिंपरी :कर्नाटकमध्ये सीमा वादाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पासिंग असणाऱ्या वाहनांची कन्नड संघटनांनी तोडफोड केली. त्यावरील प्रतिक्रिया म्हणून महाराष्ट्रातदेखीलकर्नाटकच्या बसची तोडफोड करण्यात आली. या वादामुळे महाराष्ट्र-कर्नाटक एसटी बस सेवेवर परिणाम होईल, अशी शक्यता होती. मात्र, पिंपरीतील वल्लभनगर आगारातून कर्नाटकसाठी सोडण्यात येणाऱ्या एसटी बसची सेवा सुरळीत असल्याची माहिती वल्लभनगर आगारातून देण्यात आली. वल्लभनगर आगारातून विजापूरसाठी दोन एसटी बस तसेच गाणगापूरसाठी दोन बस आणि कर्नाटकवरून हैद्रराबादसाठी जाणारी एक बस धावते.
काही दिवसांपूर्वी कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात ठिकठिकाणी कर्नाटक बसची तोडफोड करण्यात आली होती. तर महाराष्ट्रातून कर्नाटकसाठी जाणाऱ्या एसटी बस सोलापूर तसेच सीमेवर असणाऱ्या महाराष्ट्राच्या एसटी आगारात थांबविण्यात आल्या होत्या. त्यानंतर ही एसटी बससेवा पुन्हा सुरळीत सुरू झाली होती. मात्र, मागील दोन दिवसांपासून पुन्हा महाराष्ट्र विरुद्ध कर्नाटक सीमा वादाचा प्रश्न चिघळला असून, कर्नाटकमध्ये महाराष्ट्राचे पासिंग असणाऱ्या वाहनांची तोडफोड करण्यात आली. त्यामुळे महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या एसटी बस थांबविल्या जाण्याची शक्यता होती. मात्र, पिंपरीच्या वल्लभनगर आगारातून कर्नाटकसाठी सोडण्यात येणाऱ्या एसटी बसची सेवा सुरळीत सुरू आहे.
वल्लभनगर आगारात पोलिस बंदोबस्त
वल्लभनगर आगारात कर्नाटकमधून कर्नाटक सरकारच्या बस येत असतात. तसेच आगाराच्या बाहेरदेखील मोठ्या प्रमाणात कर्नाटकच्या बस उभ्या असतात. सीमा वादाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून वल्लभनगर आगारात पोलिसांचा बंदोबस्त देण्यात आला आहे. दोन पोलिस येथे सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहेत.
कर्नाटकच्या बसची संख्या घटली
वल्लभनगर आगारातून कर्नाटकसाठी पाचच बस असल्या, तरी कर्नाटक सरकारच्या १० ते १५ बस नियमित वल्लभनगर आगार परिसरात येत असतात. काही बसना वल्लभनगर आगाराकडून जागा उपलब्ध करून दिली जाते. तर काही बस आगाराच्या बाहेरूनच प्रवासी घेऊन जात असतात. मात्र, मागील दोन दिवसांत कर्नाटकच्या बसची संख्या घटली असल्याचे आगार परिसरातील विक्रेते सांगत आहेत.