पुणे - शहर नववर्षाच्या स्वागतात दंग असताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ३१ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता शहर पोलिसांचा बंदोबस्त सुरू झाला़ कोरेगाव भीमा येथील दंगल आणि त्यानंतर शहरात उमटलेले पडसाद, तसेच बुधवारचा महाराष्ट्र बंद यांमुळे गेल्या चार दिवसांत संपूर्ण पोलीस दल तब्बल ७२ तास आॅन ड्युटी होते़ सायंकाळी ५ नंतर बंद मागे घेण्यात आल्यावर त्यांना काहीसा दिलासा मिळाला़ तरीही, दिवसभरातील घडामोडींचे पडसाद पुन्हा उमटू नयेत,म्हणून रात्रीही बंदोबस्त ठेवण्यात आला होता़नववर्षाच्या स्वागताची तयारी सर्व जण करीत असताना लाखोंच्या संख्येने नागरिक रात्री रस्त्यावर उतरतात़ त्यात अनेक जण मद्य पिऊन हा दिवस साजरा करतात़ पण, त्यानंतर त्यांनी वाहन चालून इतरांना दुखापत करू नये, यासाठी काळजी घेण्याचे काम पोलिसांना करावे लागते़ ३१ डिसेंबरला सर्व जण मध्यरात्री घरी गेले तरी पोलिसांचा बंदोबस्त सोमवारी पहाटे ५ पर्यंत होता़ १ जानेवारीची बहुसंख्यांना सुटी असल्याने अनेक कार्यालयेही बंद होती; त्यामुळे रस्त्यावरील गर्दी कमी होती़ यामुळे सकाळी पोलिसांना काहीशी विश्रांती मिळाली़ पण, कोरेगाव भीमा येथे दंगल झाल्याची बातमी दुपारी १२च्या सुमारास शहरात येऊन धडकली़ या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याचे पडसाद शहरात उमटू नयेत, यासाठी दुपारी १२ पासूनच शहर पोलीस दलातील सर्व अधिकारी आणि कर्मचाºयांना अॅर्लट देण्यात आला़ रस्त्यावरच्या बंदोबस्तात वाढ करण्यात आली़ त्यामुळे १ जानेवारीला शहर शांत राहिले, तरीही बंदोबस्त सुरुच होता़ २ जानेवारीची सकाळ उजाडली तीच काहीशी तणावाच्या वातावरणात़ शहरातील तरुणांच्या मनात कोरेगाव भीमाच्या घटनेचा राग खदखदत होता़ त्यामुळे शहरातील परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अगदी पोलीस आयुक्तांसह सर्व अधिकारी आणि कर्मचाºयांचा बंदोबस्त जागोजागी ठेवण्यात आला़ तरीही त्यातून काही ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या़ त्यात पीएमपीच्या २२ बसच्या काचा फोडल्या गेल्या़ सायंकाळी परिस्थिती निवळत असल्याचे वाटत असतानाच भारिप-बहुजन महासंघाचे अॅड़ प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली़ त्याला अन्य संघटनांनी पाठिंबा दिला़ त्यामुळे पुन्हा बंदोबस्त तसाच सुरू राहिला़ मंगळवारी रात्रीपासून दोन शिफ्टमध्ये हा बंदोबस्त सुरू झाला़ स्वत: पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, सहआयुक्त रवींद्र कदम व अन्य वरिष्ठ अधिकारी सकाळी साडेसहापासूनच रस्त्यावर उतरले होते़ काही घटना घडण्याची शक्यता असल्याचे समजताच पोलीस अधिकारी, कर्मचारी त्या ठिकाणी तातडीने दाखल होत होते़ तरीही, अनेक ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या़
पोलीस ७२ तास आॅन ड्युटी, कर्तव्यात पुणे पोलीस झाले पास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2018 3:06 AM