पुणे : पोलिसांना योग्य माहिती देऊनही त्यांनी गजानन मारणे यांच्यासोबत रॅलीत सहभागी झाल्याचा आणि टोल न दिल्याचा खोटा गुन्हा दाखल केल्याचा दावा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष आशिष साबळे-पाटील यांनी केला आहे. याबाबतचे निवेदन पोलीस आयुक्तांना देण्यात आले असून मारणे यांच्या वकिलासोबत लखोटा टाकण्यासाठी तळोजा येथे गेल्याचे साबळे यांनी निवेदनात म्हटले आहे.
साबळे यांच्याविरुद्ध पोलिसांनी नुकताच गुन्हा दाखल केला आहे. याबाबत, त्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन माहिती दिली. मारणे यांच्या पत्नी मनसेच्या माजी नगरसेविका आहेत. त्यामुळे मारणेसोबत ओळख झाली. वकील कौटुंबिक स्नेही असून त्यांच्या विनंतीवरून तळोजा येथे लखोटा टाकणे तसेच बॉन्ड संदर्भात सोबत गेलो. त्यानंतर आपण पुण्याला स्वतंत्रपणे निघून आल्याचे आणि टोल भरल्याचे साबळे यांनी सांगितले. टोलच्या पावत्याही पोलिसांना दिल्या आहेत. तरी देखील आपल्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.