पुणे / औंध : औंध येथील सिद्धार्थ नगर सोसायटीमध्ये चोरट्यांना पाहून एका मार्शलने चक्क पळ काढला तर, आता गन असतानाही दुसरा पोलीस कर्मचारी समोरुन चालत जाणार्या चोरट्यांकडे पहात बसला. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाला आहे. यामुळे शहर पोलीस दलात एकच खळबळ माजली आहे.
औंध येथील सिद्धार्थ नगर परिसरातील शैलेश टॉवरमध्ये सोमवारी पहाटे पावणेतीन वाजता घडला. याप्रकरणी गोविंद यादव (वय ४४, रा. औंध) यांनी चतु:श्रृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली. यादव हे शैलेश टॉवर येथे सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. सोमवारी पहाटे ते ड्युटीवर होते. त्यावेळी चौघे जण चारचाकी वाहनातून आले. त्यांनी सोसायटीत प्रवेश केला. त्यांच्यातील दोघांनी यादव यांना पकडून ठेवले. इतर दोघे जण सोसायटीत शिरले. त्यांनी चार फ्लॅटचे कुलूप तोडून चोरी केली. त्यानंतर पाचव्या फ्लॅटचे कुलूप तोडत असताना शेजारच्या फ्लॅटमधून लोकांना चोरटे शिरल्याचा संशय आला. त्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करुन याची माहिती दिली. त्या पाठोपाठ औंध चौकीतील दोन मार्शल शैलेश टॉवरजवळ आले. चोरट्यांना शेजारच्या फ्लॅटमधून आवाज आल्याने ते तसेच खाली आले. ते सोसायटीच्या दरवाजातून बाहेर पडत असतानाच पोलीस शिपाई अनिल अवघडे व पोलीस हवालदार प्रवीण गोरे हे दोघे तेथे पोहचले होते. त्यावेळी पोलिसांना पाहून त्यांच्यातील एक जण ठोका यांना असे ओरडला. ते ऐकून मोटारसायकलवरील पोलीस कर्मचारी आपल्या सहकार्याला तेथेच सोडून मोटारसायकल वळवून तो पळून गेला. त्यानंतर चौघेही चालत चालत काही अंतरावर पार्क केलेल्या मोटारीपर्यंत गेले व तेथून ते पळून गेले. खांद्यावर गन असलेला पोलीस कर्मचारी कोणताही प्रतिकार न करता त्यांच्याकडे पहात बसला. चोरटे पळून गेल्यानंतरही या दोन्ही पोलिसांनी चोरटे पळले व घडलेल्या प्रकाराची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला दिली नाही.
चोरट्यांनी ४ फ्लॅटमधून एलईडी टीव्ही, चांदीची चैन, अंगठी, रोख ३ हजार असा २१ हजारांचा ऐवज चोरुन नेल्याचे आढळून आले.