पुणे : बॉम्बद्वारे पुणे रेल्वे स्थानक उडवून देणाच्या एका माथेफिरूच्या धमकीच्या फोनने शनिवारी पहाटे शहर पोलीस व रेल्वे पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. तसेच भुवनेश्वर-मुंबई या विमानातही बॉम्ब ठेवल्याचे त्याने सांगितल्यानंतर हे विमानही नागपूरमध्येच उतरविण्यात आले. मात्र, बॉम्बशोधक पथकाने दोन्ही ठिकाणी कसून तपास केल्यानंतर काहीही आक्षेपार्ह आढळले नाही. पोलिसांनी धमकीचा फोन आल्यानंतर त्याला साडेतीन तासांतच पाटस येथून अटक केली. त्याची मानसिकता ठीक नसल्याने त्याने हे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले.संजयकुमार मिश्रा (वय ३५, रा. धायरी, पुणे, मूळ रा. भुवनेश्वर, ओरिसा) असे या माथेफिरूचे नाव आहे. धायरीमध्ये तो तीन वर्षांपासून राहत आहे. तिथे तो ‘साई अॅनिमेशन स्टुडिओ' या नावाने अॅनिमेशनचा व्यवसाय करतो. शनिवारी पहाटे अडीचच्या सुमारास त्याने पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला पुणे रेल्वे स्थानक उडवून देण्याच्या धमकीचा फोन केला. ही माहिती रेल्वे पोलिसांना कळविण्यात आली. त्यानंतर लगेचच बॉम्ब शोधक व नाशक पथक (बीडीडीएस), श्वान पथक, शीघ्र कृती दल आदी पथकासह रेल्वे स्थानकावर धाव घेतली. दहशतवाद विरोधी पथकाने समांतर तपास सुरू केला. सकाळी सहापर्यंत संपूर्ण रेल्वे स्थानकाची कसून तपासणी करण्यात आली. मात्र, काहीही आक्षेपार्ह आढळले नाही.दरम्यान, पोलिसांनी फोन करणाऱ्याची माहिती मिळविली असता तो धायरीत राहत असल्याचे समजले. पोलिस त्याठिकाणी गेले असता घर बंद होते. मिश्रा याने हा फोन केल्याचे स्पष्ट झाले. तो सोलापूर रस्त्याने कारने भुवनेश्वरकडे जात असल्याची माहिती मिळाली. दौंड पोलिसांनी त्याला त्याला सकाळी सहाच्या सुमारास पाटस येथे ताब्यात घेतले. त्याने भुवनेश्वर-मुंबई विमानात बॉम्ब ठेवल्याचे सांगितले. भुवनेश्वर येथून या विमानाने त्यावेळी उड्डाण केलेले असल्याने पोलिसांनी तातडीने संबंधितांना कळविले. सकाळी सव्वा नऊच्या सुमारास हे विमान नागपूर येथे उतरविले. यंत्रणांनी विमानाची तपासणी केल्यानंतर काहीही आढळले नाही. नंतर विमानाला हिरवा कंदील दाखविण्यात आला. यामुळे प्रवाशांना मनस्ताप झाला.
माथेफिरूच्या धमकीने पोलीस यंत्रणा वेठीस
By admin | Published: January 24, 2016 2:14 AM