पुणे : कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये,असे आवाहन केंद्र, राज्य सरकार, प्रशासन, पोलीस यांच्यावतीने वारंवार करूनही सोमवारी व मंगळवारी दिवसभर सिंहगड रस्त्यावर काही नागरिक विनाकारण फिरताना दिसून आले. सिंहगड रस्ता पोलिसांनी त्यांना चांगलाच 'प्रसाद' दिला. परंतु बुधवारी सिंहगड रस्ता पोलिसांनी प्रत्येक वाहनचालकांना हात जोडून विनंती करीत घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले. लाठीचार्ज न करता पोलिसांनी वापरलेल्या गांधीगिरीच्या कृतीचा परिणाम असा झाला की बाहेर पडलेल्या त्या व्यक्तींच्या माना शरमेने खाली झुकल्या. सोमवारी दुपारी तीन नंतर रस्त्यावर कोणतंही वाहन घेऊन जाता येणार नसल्याचेही आदेश पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी दिले. मात्र सिंहगड रस्त्यावर काही नागरीक विनाकारण रस्त्यावर फिरताना आढळून आल्याने पोलिसांनी त्यांना चांगलाच 'प्रसाद' दिला. सायंकाळी नवले पूल, वडगांव पूल, अभिरुची मॉल परिसरात पोलिसांनी नाकाबंदी करून विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई केली. दरम्यान वाहतूक बंदी लागू करण्यात आल्याने नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकिशोर शेळके यांनी केले आहे.
सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' हे ब्रीद प्रमाण मानणाऱ्या पोलिसांची अशीही सेवासिंहगड रस्ता पोलीस ठाणे हद्दीतील अभिरुची पोलीस चौकीत आप्पा भीमाण्णा कमाने या ७५ वर्षीय जेष्ठ नागरिकाने घरातून पोलिसांसाठी चहा व बिस्किटे घेऊन आला होता.'सदरक्षणाय खलनिग्रहणाय' हे ब्रीद प्रमाण मानत चेहऱ्याला मास्क लावून पोलीस कर्मचारी नेमून दिलेल्या हद्दीत बीट मार्शलिंग करण्याचे कर्तव्य करीत आहेतच, तसेच दिवसभर बंदोबस्त करून थकवा आलेल्या पोलिसांना साधा चहा प्यायचे म्हटले तरी कुठेही हॉटेल उघडे नसल्याने मी घरूनच चहा करून आणल्याचे त्यांनी सांगितले. सेवेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या पोलिसांकरिता या जेष्ठ नागरिकाचे प्रेम पाहून उपस्थित असणाऱ्या पोलिसांनी त्यांचे आभार मानले.