पुणे : सिंहगड रस्त्यावर गाड्यांच्या जाळपोळप्रकरणी महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांना मिळाले आहेत. जाळपोळ प्रकरण झाल्यानंतरच्या सायंकाळी याच भागात झालेल्या खून प्रकरणातील माथेफिरू आरोपीचे साम्य सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळलेल्या संशयिताशी असावे, या दाट निष्कर्षापर्यंत पोलीस आले आहेत.सिंहगड रस्त्यावरच्या डॉमिनोज पिझ्झा या हॉटेलबाहेर उभ्या असलेल्या मोटरसायकलींना व या हॉटेलमागच्या परिसरातील सनसिटी रस्त्यावरच्या निर्मल टाऊनशीपमधील सूर्यनगरी, स्वामी नारायण, अवधूत, अक्षय ग्लोरी या सोसायट्यांमधील दुचाक्यांना आणि चारचाकी गाड्यांना एकापाठोपाठ आगी लावून समाजकंटक पसार झाला. रविवारी पहाटे तीन ते साडेचारदरम्यान एक ते दीड किलोमीटरच्या पट्टयात झालेल्या या भीषण दुर्घटनेत आगीच्या ५ घटनांत ८४ दुचाक्या, ६ चारचाकी गाड्या खाक झाल्या.रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास वडगाव बुद्रुकजवळील तुकाईनगर टेकडीजवळ नीलेश अमृत चव्हाण (वय ४०, समर्थनगर, हिंगणे ) याचा डोक्यात फरशी घालून खून झाला होता. त्या आरोपावरून सिंहगड रोड पोलिसांनी विनोद शिवाजी जमदाडे (वय २७, जाधवनगर, वडगाव बुद्रुक) यास अटक केली. हे दोघेही दारू प्राशन करीत बसले होते. ठेकेदारीच्या कामातील पैशांच्या वादावरून हा खून झाला होता.सह पोलीस आयुक्त सुनील रामानंद पत्रकारांना म्हणाले, की जाळपोळप्रकरणी महत्त्वाचे धागेदोरे मिळाले आहेत. तपासाच्या शेवटापर्यंत आम्ही आलो आहोत. विनोद जमदाडे याचे आणि सीसी टीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या संशयितांमध्ये बरेच साम्य आहे. त्या संशयिताने जीन पँट आणि टी-शर्ट परिधान केलेला आहे. जमदाडे याच्या अंगावर तसेच कपडे असून, तो सतत दारूच्या नशेत असतो. त्याच्याकडे चौकशी सुरू असून, त्यानेच हा प्रकार केला असावा, अशा निष्कर्षापर्यंत आम्ही ९९ टक्के आलो आहोत. जाळपोळ प्रकरणात संशयावरून ताब्यात घेतलेला बंटी पवार याच्याकडेही कसून चौकशी सुरू आहे. सिंहगड रस्त्यावर गाड्यांच्या जाळपोळप्रकरणी महत्त्वाचे धागेदोरे मिळाले आहेत. खुनाच्या गुन्ह्यात अटक केली, त्याच आरोपीचा जाळपोळीत हात असल्याचा दाट संशय आहे. जाळपोळ करणाऱ्याने हा प्रकार का केला, त्यामागे मानसिकता काय होती? या बाबी तपासात उलगडतील. - सुनील रामानंद, सह पोलीस आयुक्त
जाळपोळप्रकरणी महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती
By admin | Published: June 30, 2015 12:40 AM