पुणे : पोलीस अधिकारी असल्याचे भासवून कस्टम विभागात ओळख आहे, असे सांगत नोकरी लावून देतो म्हणून ५१ लाख १७ हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी एकास अटक केली. त्यास मंगळवारी (दि. २९) न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश आर. के. बाफना-भळगट यांनी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
राजेंद्र रामचंद्र शिंदे (वय ४३, रा. तुकाई टेकडी, काळेपडळ, हडपसर) असे कोठडी सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह एका महिलेविरोधात फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ज्येष्ठ कामगाराने फिर्याद दिली आहे. कसबापेठ, मंगळवारपेठ परिसरात २०१७ ते मार्च २०२१ या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला.
फिर्यादी हे कपड्याच्या दुकानात कामास आहेत. आरोपी शिंदे याने खाकी वर्दी परिधान केली, तसेच महाराष्ट्र पोलीस दलात सहायक पोलीस निरीक्षक असल्याची बतावणी करीत फिर्यादीचा विश्वास संपादित केला. त्यानंतर कस्टम विभागात माझी ओळख आहे, असे सांगून महिला आरोपीच्या मदतीने फिर्यादीचा मुलगा, पुतण्या आणि भाचा यांना नोकरी लावून देतो असे सांगितले आणि त्यासाठी ५१ लाख १७ हजार ४०० रुपये घेत त्यांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
अटक आरोपीकडून गुन्ह्यांतील रक्कम जप्त करणे, गुन्ह्यांत आणखी कोणी साथीदार आहे का? तसेच गुन्ह्यांत त्याच्या सहकारी महिलेस अटक करणे तसेच अशाप्रकारे पोलीस असल्याचे सांगून आरोपीने आणखी कोणाची फसवणूक केली आहे का ? आरोपीकडून जप्त केलेली खाकी वर्दी, नेमप्लेट, ओळखपत्र त्याने कोठून घेतले, याचा तपास करण्यासाठी ५ दिवसांची पोलीस कोठडी मिळावी, अशी मागणी सरकारी वकील सुरेखा क्षीरसागर यांनी केली.
....