दौंड : येथे पोलीस कॉन्स्टेबल अमजद शेख ड्यूटी बजावत असताना त्यांच्या अंगावर तीन अल्पवयीन मुलांनी दुचाकी घालून मारहाण केली. तसेच या अल्पवयीन मुलांपैैकी एका मुलाचे वडील अजय जाधव (वय ४०, रा. गोवा गल्ली, ता. दौैंड) यानेदेखील संबंधित पोलिसाला जिवे मारण्याचा प्रयत्न करून मारहाण केली असल्याची माहिती ठाणे अंमलदार गिरमे यांनी दिली.
याप्रकरणी अजय जाधव याला पोलिसांनी अटक केली असून तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. आज दुपारी १२ च्या सुमाराला अमजद शेख, शेखर झाडबुके आणि होमगार्ड अतुल कुतवळ भीमथडी शिक्षण संस्थेच्या परिसरात गस्त घालत होते. यावेळी एका दुचाकीवर (एमएच १४ सीटी ९३१८) वरून तीन मुले आली. यावेळी शेखर झाडबुके यांनी शिटी मारून गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, या तिघांनी पोलीस कॉन्स्टेबल अमजद शेख यांच्या अंगावर दुचाकी घालून गाडी चालविणाऱ्यांनी त्यांच्या उजव्या डोळ््यावर हाताबुक्क्यांनी मारले. मागे बसलेल्या दोघांच्या हातात लोखंडी वस्तू होती. या लोखंडी वस्तूने शेख यांच्या हातावर मारले आणि मोटारसायकल यांच्या अंगावर ढकलली. पोलिसांनी पकडले, म्हणून गाडी चालविणाºयाने त्याच्या वडिलांना मोबाईल करून बोलावून घेतले. त्याचे वडील अजय जाधव तातडीने दुचाकीवर आला आणि शिवीगाळ करून शेख यांच्या गालात चापट मारली. यावेळी शेखर झाडबुके पोलीस मध्यस्थी करीत असताना त्यांनादेखील धक्काबुक्की केली. या घटनेमुळे शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिसांना मारहाण होत असेल तर सर्वसामान्यांचे काय, असाही प्रश्न शहरात चर्चिला जात आहे. तेव्हा पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेसाठी जरब ठेवावी, अशी मागणी नागरिकांतून पुढे आली आहे.