पुणे : सदरक्षणाय खलनिग्रहणाय असं महाराष्ट्र पाेलिसांचं ब्रिदवाक्य अाहे. प्रत्येकाच्या मदतीसाठी पाेलीस सदैव तत्पर असतात. पुण्यातील नवीन शासकीय विश्रामगृहाच्या छतावर वायरमध्ये अडकलेल्या पारव्याची सुटका करुन पाेलिसांनी केवळ मानवाचेच नाही तर सर्व प्राण्यांचे रक्षण करण्यासाठी अाम्ही सदैव तत्पर असल्याच संदेश मंगळवारी दिला. त्यामुळे विश्रामगृहात उपस्थित असणाऱ्या लाेकांना खाकीतील भूतदयेचा खऱ्याअर्थाने प्रत्यय अाला.
वेळ दुपारी 12 ची. पुण्यातील नवीन शासकीय विश्रामगृहामध्ये पाेलीस अधिकाऱ्यांची बैठक सुरु हाेती. विश्रामगृहाच्या लाॅबीमध्ये काही पाेलीस कर्मचारी उभे हाेते. विश्रामगृहाच्या जवळ पारव्यांची गर्दी झाली हाेती. त्यातच एक पारवा विश्रामगृहाच्या लाॅबीतील छतामध्ये एका वायरमध्ये अडकला. वायरमध्ये पाय अडकल्याने त्याला बाहेर पडणे अशक्य झाले. लाॅबीमध्ये उभ्या असलेल्या पाेलीस कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास ही गाेष्ट अाली. त्यांनी तात्काळ अग्निशमन दलाला फाेन केला. अग्निशमन दल येईपर्यंत काही कर्मचाऱ्यांनी त्या पारव्याला साेडविण्याचे प्रयत्न सुरु केले. शिडीची व्यवस्था करुन एक पाेलीस कर्मचारी वर चढला. त्याने अलगदपणे त्या पारव्याला वायरच्या गुंत्यामधून साेडवले. पारव्याच्या पायाला दुखापत झाली हाेती. पाेलीस कर्मचाऱ्यांनी त्याला खाली काढून पाणी पाजले. पारवा काहीसा स्थिर झाल्यानंतर त्याला खाली साेडण्यात अाले. काही वेळाने ताे पारवा उंच भरारी घेत एका झाडाच्या फांदीवर जाऊन बसला. एका मुक्या जीवाला वाचविल्याचे समाधान येथील पाेलीस कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसत हाेते.