लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : संचारबंदीचा भंग केल्याबद्दल सध्या शहरात रस्त्यारस्त्यांवर नागरिकांची अडवणूक होतेय. महत्त्वाचे कारण असले तरी पोलीस सोडत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. दंडाची पावती फाडण्यास पोलीस भाग पाडतात. रोख पैसे नसतील तर तेथेच असलेल्या ‘पोलीस मित्रा’च्या वैयक्तिक खात्यात ‘गुगल पे’ करायला सांगतात. त्यामुळे आपल्याला पावती मिळाली, तरी हा पैसा स्थानिक पोलिसांच्या खिशात जात असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर येत आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या कानावरही या तक्रारी आल्याने आता पुणे पोलीस ‘गुगल पे’ व अन्य अॅपद्वारे होणाऱ्या व्यवहारासाठी स्वतंत्र बँक खाते उघडणार आहेत.
शहरात सुमारे ९६ ठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. येथे वाहनांची तपासणी होते. महत्त्वाचे काम असले तरी पोलिस अडवतात. जबरदस्तीने पाचशे रुपयांची पावती करायला सांगतात. पैसे नसतील तर खासगी व्यक्तीला ‘गुगल पे’ करायला लावतात. ‘टार्गेट’ पूर्ण करण्यासाठी अगदी योग्य कारण असले, तरी पावत्या फाडल्या जात असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.
गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख यांनी सांगितले, “अशा अनेक तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत. संबंधितांना पावती दिली जात असेल, तर त्याच्या पैशांचा भरणा पोलिसांच्या खात्यात करावा लागतो. ही तेथील त्या वेळची ॲडजेस्टमेंट असेल. त्याला भ्रष्टाचार म्हणता येणार नाही. पण तरीही ती अनियमितता आहे.”
या तक्रारींची दखल घेऊन अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नवी व्यवस्था तयार करण्यात येत आहे. त्यानुसार भांडारकर रस्त्यावरील खासगी बँकेत स्वतंत्र खाते उघडण्यात येणार आहे. पुणे पोलीस दलातील सर्व ३२ पोलीस ठाण्यांच्या नावाने स्वतंत्र कोड असणार आहे. त्यामुळे कोणत्या पोलीस ठाण्याच्या अंतर्गत किती दंड वसूल करण्यात आला. त्याची माहिती प्रत्येक दिवशी सायंकाळी समजू शकेल. त्यामुळे लोकांकडून वसूल होणारी दंडाची रक्कम खासगी व्यक्तीच्या खात्यावर जाणार नाही.
चौकट
वाहतूक शाखेत ज्याप्रमाणे सर्व प्रकारच्या दंडात्मक कारवाईसाठी ‘कॅशलेस’ व्यवस्था आहे. तशीच व्यवस्था ‘कोरोना’ दंडवसुलीसाठी करण्यात येणार आहे. येत्या २ ते ३ दिवसांत ही योजना आकाराला येईल.-
डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त
चौकट
चौकट
लॉकडाऊनमध्ये ‘वसुली’?
“आईचा अपघात झाल्याने रविवारी नांदेड सिटीतून कासारवाडीला निघालो. कारमध्ये मी व पत्नी दोघेच होतो. राजाराम पुलाच्या कोपऱ्यावर पोलिसांनी अडविले. खूप सांगितले तरी ते ऐकायला तयार नव्हते. पुरावा मागत होते. आता नुकताच अपघात झाल्याचे समजल्यानंतर पुरावा कोठून आणणार? २ हजार रुपये दंड मागितला. गयावया केली तेव्हा ३०० रुपये घेतले. पावती न देताच घरी परत जायला सांगितले. ही कसली अडवणूक, लॉकडाऊनचा आधार घेत कसली वसुली सुरू आहे?”
-विजय शेंडगे, नागरिक
चौकट
३ जूनची कारवाई
दंडात्मक कारवाई - १ हजार ७७१
दंड वसुली - ८ लाख ६५ हजार ८०० रुपये