किरण शिंदे
पुणे: १९ फेब्रुवारी, शिवजयंतीचा दिवस.. याच दिवशी गुंड गजा मारणेच्या टोळीतील गुंडांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा निकटवर्तीय देवेंद्र जोग याला मारहाण केली होती.मंत्र्याच्या जवळच्या व्यक्तीलाच मारहाण करण्यापर्यंत मारणे टोळीची मजल गेल्याने मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री असलेल्या मुरलीधर मोहोळ यांनी पुणेपोलिसांना खडेबोल सुनावले होते आणि आरोपींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना पुणे पोलिसांना दिल्या होत्या. त्यानुसार पुणे पोलिसांनी कारवाई केली असून खुद्द गजा मारणे यालाच या संपूर्ण प्रकरणात अटक करण्यात आली आहे..
मारहाण झालेल्या या प्रकरणात पुणे पोलिसांनी आता गुंड गजा मारणे याच्यावर देखील गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर गजा मारणे स्वतः पोलिसांसमोर हजर झाला. सोमवारी सायंकाळी गजा मारणे आई सोबत कोथरूड पोलीस ठाण्यात हजर झाला. पुण्याचे मालक असं बिरुद लावून फिरणारा गजा मारणे पोलिसांसमोर येताच सुतासारखा सरळ झाला. पोलिसांनीही त्याला त्याची जागा दाखवत इथे इथे बसायचं असं म्हणत चक्क जमिनीवर बसवलं. त्यानंतर कुठलीही तक्रार न करता गजा मारणे हात जोडून जमिनीवर बसला. दरम्यान या संपूर्ण प्रकरणात गजा मारणे याचा रोल नेमका काय आहे हे अद्याप स्पष्ट झालं नाही. आज त्याला कोर्टात हजर केले जाईल. आणि त्याचा नेमका गुन्हा काय आहे हे स्पष्ट होईल.
दुसरीकडे ऍड विजयसिंह ठोंबरे यांनी गजानन मारणे याची बाजू मांडली. या संपूर्ण प्रकरणात गजानन मारणे संशयित आरोपी आहे. त्या गुन्ह्यात आपलं नाव आल्याचं माहित झाल्यानंतर गजानन मारणे स्वतः पोलिसात हजर झाला. त्याला पोलिसांनी अटक केली नाही. पोलिसांना सहकार्य करण्याची त्याची भूमिका असल्याचेही ठोंबरे यांनी सांगितले.
दरम्यान कोथरूड पोलीस ठाण्यात हजर झालेल्या गजानन मारणेला पोलिसांनी अटक केली. आज त्याला कोर्टात हजर केले जाणार आहे. आणि त्याच्यावर नेमकी आरोप काय आहेत हे समोर येईल. मात्र पुणे पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणात आता मोका कायद्यानुसार कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या संपूर्ण प्रकरणात 27 आरोपी पोलिसांच्या रडारवर असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. आणि या प्रकरणात मोकानुसार कारवाई झाली तर ती मारणे टोळीसाठी मोठा धक्का असेल.