पुणे : बलात्काराच्या गुन्ह्यात जामीन मिळण्यासाठी न्यायालयात रिपोर्ट तक्रारदाराच्या वडिलांच्या बाजूने पाठविण्याबरोबरच गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी कोंढवा पोलीस ठाण्यातील एका महिला पोलीस उपनिरीक्षकासह कर्मचा-याला १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून बुधवारी तीन वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या घटनेने पुणे पोलीस दलात खळबळ माजली आहे. स्वाती मोरे (वय ३४, पोलीस उपनिरीक्षक) आणि हर्षल राजेंद्र शिवरकर (वय ३२, पोलीस कॉन्स्टेबल) अशी पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत. तक्रारदार यांच्या वडिलांच्याविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल आहे.या गुन्ह्याचा तपास पोलीस स्वाती मोरे करीत आहेत. या गुन्ह्यामध्ये तक्रारदार यांच्या वडिलांना अटक करण्यात आली असून, सध्या ते कारागृहात आहेत. तक्रारदार यांच्या वडिलांना जामीन मिळण्यासाठी न्यायालयात आरोपीच्या बाजूने रिपोर्ट पाठविण्यासाठी स्वाती मोरे आणि शिवरकर यांनी त्यांच्याकडे १५ हजार रुपयांची लाच मागितली होती. अशी तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारदाराने केली. त्या तक्रारीची पडताळणी केली केल्यानंतर मोरे आणि शिवरकर यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात लाचेची रक्कम स्वीकारल्याचे निष्पन्न झाले. या दोघांवर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिला पोलीस उपनिरीक्षकासह कर्मचा-याला लाच घेताना पकडले, लाचलुचपतविरोधी विभागाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 12:51 AM