पुणे : आता त्यांनी वयाची एकसठ्ठी पार केलेली... ऐकायला थोडे कमी येते़...सेवानिवृत्तीनंतर ते सध्या गावाकडेच शेतीत रमलेले... असे असताना तब्बल २० वर्षानंतर त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक होतंय़.. वरिष्ठ पोलीस अधिकारी त्यांचे आवर्जुन स्वागत करतात़. त्यांना सॅल्युट ठोकतात़ . पोलीस सेवेत असताना कधीही ऐवढे कौतुक झाले नाही, एवढे कौतुक आता होत असल्याचे पाहून ते भावनिक झाले़. ही व्यक्ती आहे सहाय्यक फौजदार सर्जेराव कांबळे. कांबळे यांनी १९९८ मध्ये सीमा (वय ३) आणि रिमा (वय २) या दोन हरविलेल्या लहान मुलींना ससून रुग्णालयातील सोफेश संस्थेत दाखल केले होते़. त्यांना न्यूझिलंडमधील एका दांम्पत्याने दत्तक घेतले होते़. २० वर्षानंतर त्या आपल्याला सुरक्षितपणे संस्थेत दाखल करणाऱ्या खाकी वर्दीतील देवदूताचा शोध घेण्यासाठी व त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्या दोन सख्ख्या बहिणी पुण्यात आल्या. त्यांनी डेक्कन पोलीस ठाण्याला २ जानेवारीला भेट दिली होती़. त्यानंतर पोलिसांनी त्यांना सोफेशमध्ये दाखल करणारे एस़ के़ कांबळे यांचा शोध सुरु केला़ तेव्हा ते भोरमधील केंडाळे गावात रहात असल्याची माहिती मिळाली़. त्यांचा मुलगा किरण कांबळे व जावई विजय रणधीर हे त्यांना घेऊन सोमवारी स्वारगेट पोलीस ठाण्यात आले होते़ .स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी त्यांचा सत्कार केला़ यावेळी सामाजिक कार्यकर्त्या मनिषा निंबाळकर, अलका जाधव उपस्थित होत्या़ सर्जेराव कांबळे हे स्वारगेट पोलीस ठाण्यातून 31 मे 2007 मध्ये सेवानिवृत्त झाले होते़. त्यांना त्या घटनेविषयी विचारले असता कांबळे यांनी सांगितले की, प्रभात पोलीस चौकीत त्यावेळी मी नेमणूकीला होतो़. संजीवनी हॉस्पिटलच्या मागे दोन लहान मुली रडत असून त्या हरविल्या आहेत, असे कळविले़. मी तेथे गेलो तेव्हा, त्यांच्या आई किंवा वडिलांपैकी कोणीतरी त्यांना इडली खायला देऊन तेथे बसवून सोडून गेले होते़. मला पाच मुली आहेत़, त्यामुळे त्या मुलीकडे पाहून मला माझ्या मुलींची आठवण आली़ मी त्यांच्या डोक्यावरुन मायेने हात फिरवून विचारले तर त्यांना काही सांगता येत नव्हते़. मग गाडी बोलावून त्यांना ससून रुग्णालयातील संस्थेत नेले़. त्यांच्या आईवडिलांना खूप शोध घेतला पण ते मिळाले नाहीत़. आता गावाला असताना ‘लोकमत’मध्ये आलेले बातमी वाचून त्या मुली माझी चौकशी करीत असल्याचे समजले़ इतक्या वर्षानंतरही मी केलेल्या कामाचे कौतुक होतेय, हे पाहून समाधान वाटते़. न्युझिलंडवरुन या दोन तरुणी जेव्हा डेक्कन पोलीस ठाण्यात आल्या़ तेव्हा कांबळे यांनी २० वर्षापूर्वी केलेल्या कामाचे महत्व सर्वांनाच जाणवले़. ‘लोकमत’ची बातमी वाचल्यानंतर पोलीस प्रशासनाच्या उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी एस के़ कांबळे या नावाचे पोलीस कर्मचारी कोण याचा शोध घेण्यास सुरुवात केली़. तीन तासाच्या प्रयत्नानंतर या नावाचे तीन कर्मचारी आढळून आले़. त्याबाबत स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी सांगितले की, पोलीस आयुक्तालयातील महिला कर्मचारी पठाण यांनी फोन करुन सर्जेराव कांबळे यांचा पत्ता देऊन त्यांचा शोध घ्यायचा असल्याचे सांगितले़. त्यानुसार राजगड पोलीस ठाण्याशी संपर्क केला़ तेथून त्यांच्या केंडाळे गावाच्या पोलीस पाटील यांच्याशी संपर्क केला़. तेव्हा त्यांचा मुलगा पुण्यात असल्याचे त्यांनी माहिती दिली़ त्यावरुन त्यांच्याशी संपर्क झाला़. डेक्कन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांनी सांगितले की, कांबळे यांच्या कामगिरीने सर्व पोलीस दल हेलावून गेले होते़. वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही त्यांची माहिती घेण्यास सांगितली होती़. सर्जेराव कांबळे यांचा पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांनी सत्कार केला़. पोलीस दलाकडून मिळालेल्या या सॅल्युटमुळे सर्जेराव कांबळे हे हरखून गेले होते़ काय बोलावे हे त्यांना सुचत नव्हते़.
अन त्यांच्या डोळ्यात तरळले अश्रू : २० वर्षानंतर कामाचे कौतुक झाल्याने ते झाले भावनिक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2019 5:40 PM