पिंपरी: पिंपरीत वाळू चोरणाऱ्यांवर पोलिसांनी चांगलीच करडी नजर ठेवली आहे. सद्यस्थितीला शहरात वाळूची विक्री आणि तस्करी करणाऱ्या लोकांवर विशेष लक्ष ठेवले जात आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडपोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने मंगळवारी वाल्हेकरवाडी ते रावेतकडे जाणाऱ्या रस्त्यावर विनापरवाना वाळूची चोरटी वाहतूक करून विक्री करणाऱ्या दोघांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून एक ट्रक तसेच २७ हजारांची तीन ब्रास वाळू, असा तीन लाख ७७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
ऋषिकेश अनिल चव्हाण (वय २१, रा. शिरूर), राजू परमेश्वर खोत (वय ३३, रा. वाघोली), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह रोहित कराळे (वय ३०, रा. काळेवाडी) यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषिकेश चव्हाण हा ट्रक मालक आहे. तर खोत हा ट्रक चालक आहे. तसेच कराळे हा वाळू सप्लायर आहे. आरोपी हे वाळू चोरून त्याची विक्रीकरिता वाहतूक करणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी चिंचवड येथे वाल्हेकरवाडी ते रावेत कडे जाणाऱ्या रस्त्यावर सापळा रचून वाळू वाहतूक करणारा ट्रक पकडला. वाळूची चोरी करून विनापरवाना रॉयल्टी नसताना चोरटी वाहतूक करून आरोपी हे वाळूची विक्री करणार असल्याचे समोर आले. तीन लाख ५० हजारांचा ट्रक तसेच २७ हजारांची तीन ब्रास वाळू, असा एकूण तीन लाख ७७ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. सामाजिक सुरक्षा पथकाचे उपनिरीक्षक प्रदीपसिंग सिसोदे आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.