पुणे : आम्ही क्राईम ब्रँच युनिट २ चे पोलीस आहोत, तुम्ही ब्लँकने गॅस सिलिंडर विकता, तुमच्यावर केस करावी लागेल, असे सांगून गॅस एजन्सीच्या डिलिव्हरी बॉयचे अपहरण करुन चोरट्यांनी २ लाख रुपयांची खंडणी वसूल केल्यावर त्याची सुटका केली. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने तपास करुन तिघांना अटक केली आहे.
विकास बाबू कोडीतकर (वय ३०, रा. दत्तनगर, कात्रज), सतीष सुधीर वांजळे (वय३३), सुदर्शन किशोर गंगावणे (वय २५, रा. शिवशंकर सोसायटी, बिबवेवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तसेच त्यांचा साथीदार मुकेश ऊर्फ मांगीलाल व इतर ६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार चतु:श्रृंगी मंदिरासमोर १५ मार्च रोजी दुपारी चार वाजता घडला होता.
याप्रकरणी श्रीराम भादू (वय २८, रा. लक्ष्मीनगर, पिंपळे गुरव) यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फियार्दी हे गॅस एजन्सीमध्ये टेम्पोतून सिलिंडरची डिलिव्हरी करतात. ते १५ मार्च रोजी दुपारी टेम्पो घेऊन चतु:श्रृंगी मंदिराजवळून जात असताना एक कार व मोटारसायकलवरुन ६ जण आले. त्यांनी टेम्पोला कार आडवी घालून त्यांना थांबविले. आम्ही क्राईम ब्रँच युनिट २ चे पोलीस आहोत, असे सांगून तुम्ही ब्लॅकने गॅस सिलिंडर विकता, तुमच्यावर केस दाखल करावी लागेल, असे सांगून त्यांना व त्यांचा साथीदार कैलास यांना कारमध्ये जबरदस्तीने बसवून अपहरण केले. त्यांना स्वारगेट परिसरात फिरविले. केस नको असेल तर ५ लाख रुपये द्यावे लागतील, नाही तर जेलची हवा खावी लागेल, असे सांगितले. त्यांना कारमध्ये मारहाण करुन तुमचे हातपाय तोडून जिवे मारुन टाकू अशी धमकी दिली. कैलाश याच्या शर्टचे खिशातील ४ हजार ५०० रुपये व मोबाईल काढून घेतला. त्या मोबाईलवरुन फिर्यादी यांच्या नातेवाईक व ओळखीच्या लोकांना फोन करुन पैशांची मागणी केली. भवरलाल यांच्याकडून २ लाख रुपये घेतल्यानंतर त्यांना सोडून दिले.
पोलीस पथकाने चौकशी करुन तिघांना अटक केली याबाबत गुन्हे शाखेच्या युनिट २ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी सांगितले की, हा प्रकार घडल्यानंतर फिर्यादी हे गुन्हे शाखेच्या युनिट २चा शोध घेत आले. त्यांनी तुमच्या पोलिसांनी आपल्याला व साथीदाराला लुटल्याचे सांगितले़ हा प्रकार पूर्वी विश्वनाथ गॅस एजन्सीमध्ये काम करणारा व मालकांनी त्याला कामावरुन काढून टाकलेला मांगीलाल याने केल्याचा संशय व्यक्त केला होता. त्यानुसार आमच्या पथकाने चौकशी करुन तिघांना अटक केली आहे.