पुणे : विश्वचषक स्पर्धेतील भारताच्या पाकिस्तानवरील विजयानंतर फर्ग्युसन रोडवर मोठ्या प्रमाणावर जल्लोष करण्यासाठी जमलेल्या तरुणाईवर पोलिसांनी जोरदार लाठीमार केल्याची घटना मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या डेक्कन जिमखान्यावर सुमारास घडली.भारताने पाकिस्तानवर विजय मिळविल्यानंतर आनंद साजरा करण्यासाठी फर्ग्युसन रोडवर मोठ्या संख्येने तरुणाई जमली होती. दुचाकी, चारचाकी, जीपवर चढून हवेते तिरंगा फडकावित ते जल्लोष करीत होते. त्यामुळे संपूर्ण रस्ता अडविला गेला होता. मोठमोठ्या आवाजात गाड्यांवर स्पिकर लावून पेट्रोल पंपाशेजारी तरुण गाड्यांवर चढून नाचत होते. काही तरुण तिरंगा झेंडा घेऊन बसवर चढून नाचत होते. त्यामुळे संपूर्ण फर्ग्युसन रोड पूर्णपणे जाम झाला होता. हे पाहिल्यावर रात्री १२ वाजण्याच्या सुमारास गुडलक चौकातून जलद कृती दलाचे काही जवान हातात काठ्या घेऊन धावत आले. त्यांनी पुढे मागे न पाहता समोर दिसेल, त्यांच्यावर लाठीमार करण्यास सुरुवात केली. त्याच्या लाठीच्या तडाख्यात काही लहान मुलेही सापडली. काही जण नाचणाऱ्या या तरुणांचा व्हिडिओ काढत होते. त्यांनाही या जवानांच्या लाठीचा प्रसाद मिळाला. पोलिसांच्या या लाठीमारामुळे कडेच्या गाड्याही अस्ताव्यस्त पडला. जमलेले तरुण वाट मिळेल तिकडे पळत सुटले. त्यात अनेक जण पडून किरकोळ जखमी झाले. काही मिनिटात पोलिसांनी चौक रिकामा केला.
टीम इंडियाच्या विजयाचा जल्लोष करणाऱ्या तरुणाईवर पोलिसांचा लाठीमार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2019 1:14 AM