पिंपरी : पुण्यात हनुमान टेकडीवर तरुणीवर बेतलेल्या अतिप्रसंगाच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर महिलांना असुरक्षित ठरणाऱ्या शहरातील ठिकाणांची लोकमतने पाहणी केली. तेथील वस्तुस्थितीचे वृत्त प्रकाशित केले. त्याची दखल घेऊन सहायक पोलीस आयुक्त मोहन विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने दुर्गादेवी टेकडी, बर्ड व्हॅली अशा सार्वजनिक ठिकाणी भेट दिली. त्या ठिकाणी आलेल्या तरुण-तरुणींना दक्षता घेण्याच्या सूचना केल्या. पिंपरी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त विधाते यांनी गुरुवारी दुपारी पोलीस पथकासह दुर्गादेवी टेकडी, बर्ड व्हॅली या पिकनिक स्पॉटला भेट दिली. तेथे आलेल्यांना त्यांनी दक्षता घेण्याबाबत समजून सांगितले. दुर्गादेवी टेकडी व बर्ड व्हॅली येथे रखवालदारीचे काम करणाऱ्यांना संशयास्पद काही वाटल्यास वेळीच पोलिसांना कळवावे. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची खबरदारी घ्यावी. महिलांसाठी असुरक्षित ठरेल, अशा ठिकाणी गस्त वाढविण्याचे नियोजन आहे. (प्रतिनिधी)दुर्गादेवी टेकडी,बर्ड व्हॅली तसेच रावेत येथील पवना नदी परिसर, आकुर्डी रेल्वे स्थानक परिसर आदी ठिकाणी पोलिसांची गस्त राहील. अशा ठिकाणी टवाळखोर तरुणांचा वावर वाढणार नाही, या दृष्टीने बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. पिकनिक स्पॉटवर जमणाऱ्या टवाळखोरांना प्रतिबंध करावा. उद्यानात फेरफटका मारण्यासाठी कुटूंबासह येणाऱ्यांना त्रास होणार नाही, याची काळजी घेतली जावी, असे बर्ड व्हॅलीच्या व्यवस्थापकांना सांगण्यात आले आहे.शाळा, महाविद्यालयांचे प्राचार्य आणि शिक्षक यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. महाविद्यालयात वेळोवेळी दांड्या मारणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनाही सूचना दिल्या जातील. अशा प्रकारचे उपक्रम घेऊन विद्यार्थी व पालकांचे समुपदेशन करण्याचा प्रयत्न राहील, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
उद्यानातील प्रेमी युगुलांना पोलिसांनी दिली समज
By admin | Published: March 04, 2016 12:29 AM