पुणे : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने राष्ट्रीय पोलीस पदकांची घोषणा केली असून यामध्ये राज्य दहशतवादी विरोधी पथकाच्या आणि ग्रामीण पोलिसांच्या प्रत्येकी एका पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश आहे. दहशतवाद विरोधी पथकाच्या पुणे शाखेचे सहायक पोलीस फौजदार प्रदीप ऊर्फ बापू हरिश्चंद्र जांभळे यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्द्ल पोलीस पदक जाहिर झाले आहे. जांभळे १९८७ साली पुणे शहर पोलीस दलामध्ये भरती झाले. त्यांनी सहकारनगर, सांगवी, खडकी पोलीस ठाण्यांसह विशेष शाखा, गुन्हे शाखा येथे काम केले आहे. त्यांनी आजवर २१ लाख ९० हजारांचे तब्बल १०१ बेकायदा अग्निशस्त्र व १३८ जिवंत काडतुसे पकडली आहेत. विविध गुन्ह्यांमधील आरोपींना जेरबंद करण्यासोबतच दहशतवादी कट करुन आयएसआयकरिता काम करणाऱ्या पाच बांग्लादेशींना पकडण्यात सहभाग घेतला. तसेच ५२ लाख रुपयांचे हेरॉईन जप्त करुन मोठी कारवाई केली आहे. वेश्याव्यवसायात ढकलल्या गेलेल्या अल्पवयीन ७० आणि सज्ञान १४० मुलींची सुटका करुन ८० आरोपींना अटक केली आहे. आतापर्यंत ३२८ बक्षिसे मिळाली आहेत. त्यांना २००९ साली पोलीस महासंचालकांचे पदक मिळालेले आहे.तर पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या वडगाव मावळ पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेल्या दशरथ बाबुराव चिंचकर यांनाही गुणवत्तापूर्ण सेवेबद्द्ल पोलीस पदक जाहिर झाले आहे.
पुण्यातील दोघा जणांना राष्ट्रपती ‘पोलीस पदक’
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2020 9:18 PM